कणकवली शहरात 7 ठिकाणी घरफोडी

2

मध्यरात्रीची घटना ः पोलिसांच्या नाकाबंदीनंतरही चोरटे पसार

कणकवली, ता. 24 : कणकवली शहरातील शिवाजीनगर परिसरात मध्यरात्रीनंतर 5 फ्लॅट आणि 2 बंद घरे चोरट्यांनी फोडली. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सातही ठिकाणी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. मात्र घर मालक कणकवलीत दाखल झाल्यानंतर एकूण किती ऐवज चोरीला गेला याची निश्‍चिती होणार आहे. दरम्यान रात्री दोनच्या सुमारास शिवाजीनगर परिसरात चोरी झाल्याचे स्थानिकांनी पोलिसांना कळवले होते. त्यानंतर शहर परिसरात पोलिसांनी नाकाबंदीही केली. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागले नव्हते.
कणकवली शहरात चार महिन्यापूर्वी सात ठिकाणी चोरीच्या घटना झाल्या होत्या. त्यानंतर काल मध्यरात्री पुन्हा एकदा शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला. शहरातील शिवाजीनगर परिसरात शिवाजीनगर परिसरात गल्ली नं 3 आणि गल्ली नं 4 मधील फ्लॅट आणि घरांना चोरांनी लक्ष्य केले. यात 5 फ्लॅट आणि 2 घरे चोरांनी फोडली.
चोरी झालेल्या एका ठिकाणांमध्ये सार्वजनिक बांधकामचे निवृत्त कार्यकारी अभियंता कै.राजरत्नम यांच्या बंगल्याचा समावेश आहे. या बंगल्यातून चांदीचे दागिने तसेच इतर ऐवज लंपास झाला आहे. कै.राजरत्नम यांच्या पत्नी सायंकाळी कणकवलीत दाखल होणार आहेत. त्यानंतर चोरीस गेलेल्या मुद्देमालाची नेमकी माहिती समजणार आहे. राजरत्नम यांच्या बंगल्यालगत असलेल्या वासुदेव मोंडकर यांचेही घर चोरट्यांनी फोडले. या घरात दिलीप बिल्डकॉनचा अभियंता राहत होता. तो गावी गेला असल्याने घर बंद होते. याखेरीज निसर्ग अपार्टमेंटमधील रावजी सावंत आणि शैलेश तांबे यांचेही फ्लॅट चोरट्यांनी फोडले. याच कॉम्प्लेक्समध्ये सेवानिवृत्त शिक्षक विलास पाटील यांचे दोन जॉइंट फ्लॅट आहेत. यातील एका फ्लॅटचा कडी कोयंडा तोडताना पाटील यांना आवाज आला. त्यांनी दरवाजाला असलेल्या दुर्बिणीतून पाहिल्यानंतर दोन चोरटे दरवाजा फोडताना आढळून आले. तसेच पाटील यांची चाहूल लागताच चोरटे पसार झाले. त्यानंतर पाटील यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
रात्री 2 वाजता चोरीच्या घटनेबाबत माहिती मिळताच तातडीने उपनिरीक्षक प्रकाश कदम, जमादार विनायक चव्हाण, शिवाजी सावंत, अबीटकर आदीं तात्काळ शिवाजीनगरात दाखल झाले. तसेच कणकवली पोलिस पथकाने रात्रीच शिवाजीनगरसह रेल्वे स्थानक तसेच शहर परिसरात पेट्रोलिंग केले. मात्र, चोरटे आढळून आले नाहीत. आज सकाळी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, महिला पोलिस उपनिरीक्षक जयश्री पाटील, हवालदार उत्तम पवार आणि पोलिस कर्मचार्‍यांनी शिवाजीनगरमध्ये चोरी झालेल्या ठिकाणांची पाहणी केली.

27

4