मोबाईल चोरीतील अल्पवयीन युवकाला घेतले ताब्यात

133
2
Google search engine
Google search engine

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 50 हजार रुपयांचे साहित्य केले हस्तगत

सिंधुदुर्गनगरी ता.२४: वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुह्याखाली सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एक १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाला बालकल्याण समिती उमरखडी डोंगरी मुंबई येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला ५० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच वेंगुर्ला वेतोबा मंदिरातील दान पेटी चोरी प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी दिली.
वेंगुर्ला येथे मोबाईल शॉपी मध्ये चोरी झाली होती. यात मोबाईल, चार्जर, पॉवर बँक, रोख रक्कम आदिवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाच्या छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आपली तपासाच्या दिशेने कार्यवाही सुरु केली होती. दरम्यान या चोरी प्रकरणी एलसीबीच्या पथकाने उत्तर प्रदेश येथील १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाला बालकल्याण समिती उमरखडी डोंगरी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेल ६ मोबाईल, ४ मोबाईल चार्जर, ५ चार्जर कार्ड, ३ पॉवर बँक, १ हेडफोन, १ ब्ल्यूटुथ हेडफोन, १ ब्ल्यूटुथ स्पीकर, ३ जुनी मनगटी घड्याळ, ७ पॉवर बँक कनेक्टर आणि १५ हजार रूपये रोख रक्कम असा एकूण ५० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच ६ जुलै रोजी वेंगुर्ला तालुक्यातील श्री वेतोबा मंदिर आरवली च्या दान पेटीवर चोरट्यांनी डल्ला मारत ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात चोरी प्रकरणात विधिसंघर्ष बालक सीसीटीव्ही मध्ये दिसत असल्याने संबधित बालकाची दानपेटी चोरी प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली.