वैभववाडी ता,२४ :हैद्राबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी वैभववाडी तालुक्यातील करुळ गावचा सुपूत्र आर्यन विजय कोलते या युवा खेळाडूची निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कु. आर्यन सध्या पेस आयआयटी कॉलेज ठाणे येथे अकरावी इयत्तेत शिकत आहे. थाई बॉक्सिंग असोसिएशन जिल्हा ठाणे यांच्या वतीने जूनमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत आर्यन याने सुवर्ण पदकाची कमाई केली. नुकतीच लातूर येथे राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून जवळपास ४५० खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशन (MTA) यांच्या मार्फत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत आर्यन याने सिल्वर मेडल खिशात टाकत आपली घौडदौड कायम राखली. पुढील महिन्यात हैदराबाद येथे थाई बॉक्सिंग इंडियन फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धा पार पडणार आहे. आर्यन याला प्रशिक्षक बाळा साठे ठाणे यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र राज्यातून आर्यन याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
फोटो- आर्यन कोलते.