आ. नितेश राणे यांचा उपक्रम : शंभर गाडयांची केली व्यवस्था
कणकवली, ता. २४ : कोकणातील गणेशभक्तांना बाप्पा पावला असून, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाला येणाºया भाविकांना केवळ १०० रुपयात गणेशचतुर्थीला गावी येता येणार आहे.‘दर वरसा प्रमाण यंदापण गणपतीक १०० रुपयात गावाक जावक मिळणार हा…! मुंबयसून चाकरमान्यांसाठी १०० गाडये सोडणार हवं, मुंबई, ठाणे, वसई, डोंबिवली, तुन गाडये सुटतले.. चाकरमान्यांनी हेचो लाभ घेवचो..’अशा मालवणी बोलीभाषेत ट्विट करत आमदार नितेश राणे यांनी या उपक्रमाची माहिती दिली आहे. कोकणवासीय जगाच्या कुठल्याही कोपºयात राहत असले तरी गणेशचतुर्थीला आवर्जून आपल्या घरी कोकणात दाखल होतात. यावर्षीसुद्धा केवळ १०० रुपयांत गणेशचतुर्थीला गावी जाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी १०० गाडया सज्ज ठेवल्या जाणार असल्याचे ट्विट करत आमदार नितेश राणे यांनी रेल्वेच्या तिकीट न मिळाल्याने चिंतेत असलेल्या गणेशभक्तांना खुशखबर दिली आहे.
कोकणात गणेशोत्सवला लाखो भाविक चाकरमानी दाखल होतात. रेल्वे आणि खाजगी लक्झरी, एसटी बसेस रिझर्वेशन सुरू होताच हाऊसफुल्ल होतात. खासगी बसचे दर अव्वाच्या सव्वा आकारले जातात. वाहतुकीच्या सोयीअभावी लाडक्या गणरायाच्या दर्शनाला सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील गणेशभक्तांना नाईलाजास्तव जाता येत नाही. गणेशभक्तांची नेमकी हीच अडचण ओळखून आमदार नितेश राणे यांनी गेली ६ वर्षे केवळ १०० रुपयांत खाजगी बससुविधा उपलब्ध करून देत आहेत. यावर्षीसुद्धा बसची संख्या वाढवून १०० बसची सोय गणेशभक्तांसाठी करण्यात आली आहे. प्रतिसीट केवळ १०० रुपयांत अशा १०० गाड्यांतून गणेशभक्त चाकरमान्यांना आपल्या गावी गणेशचतुर्थीला आ. नितेश राणे गावी आणणार आहेत. कोणत्या ठिकाणाहून, कोणत्या तारखेला, किती गाड्या सुटणार आणि सीट बुकिंगसाठी कुठे संपर्क साधावयाचा याची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आ. नितेश राणे यांनी टिवट्व्दारे कळविले आहे.