शासन कुळांना हक्क देत नाही तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार…

171
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आचरा देवस्थान जमीन प्रश्न पेटला ; लढा तीव्र करण्याचा ग्रामसभेत निर्धार…

मालवण, ता. २४ : जमिनी देवस्थानकडे पूर्ववत जमा करण्याचा निकाल दिल्यानंतर आचरा गावात देवस्थान जमिनीचा प्रश्‍न पुन्हा उफाळून आला आहे. या निकालानंतर देवस्थान जमिनप्रश्‍नी लढ्याची दिशा ठरवण्यासाठी आचरा गावाची खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेत जोपर्यंत शासन कुळांना त्यांचे हक्क मिळवून देत नाही तोपर्यंत होणार्‍या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा आचरा ग्रामसभेत एकमुखी ठराव घेण्यात आला. यावेळी लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी गावसमिती ग्रामसभेत गठित करण्यात आली असून आचरा गावातील बारावाड्यांमध्ये पोटसमित्या निर्माण करून देवस्थान जमिनीप्रश्‍नी लढा तीव्र
करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी बेकायदा हस्तांतरण प्रश्‍नी प्रांताधिकारी यांनी दिलेल्या निकालाविरोधात अपील करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
आचरा देवस्थान जमिनप्रश्‍नी खास ग्रामसभा सरपंच प्रणया टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. यावेळी आचरा ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंच अनिल करंजे, श्रीकांत सांबारी, अशोक गावकर, विनायक परब, प. स. सदस्य निधी मुणगेकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, माजी सरपंच चंदन पांगे, समीर ठाकूर, सुहास सावंत, सचिन कुबल व ग्रामस्थ उपस्थित होते.
देवस्थान जमिनीत १९७४ पासून खरेदीखत झाली आहेत. त्यासाठी शासनाने पैसेही घेतले आहेत. जर हे बेकायदेशीर होते तर तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांनी खरेदीखते का केली. नोंदी त्यावेळी कशा घातल्या गेल्या असा सवाल करत अनिल करंजे यांनी करत ७० ब खाली तहसिलदारांकडे दावे सुरू असताना देवस्थानच्या विश्वस्त त्यावेळी कुळ लावण्यासाठी तहसीलदार समोर हजर राहत आपली संमती दर्शवत होते हे निदर्शनास आणत आज हेच तहसीलदार प्रांत पुर्ननिरिक्षाचे अर्ज दाखल करून बेकायदा हस्तांतरण ठरवत कुळांना नाहीसे
करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप कुबल यांनी ग्रामसभेत केला.
पारपत्र काढताना सातबारा द्यावा लागतो. मात्र आता कुळे नष्ट करण्याचा डाव आखला गेला आहे. सारबारावरचे नावच शिल्लक राहिले नाहीतर आपण आचरावासी गावचे रहिवासी कसे ठरणार. भारताचे नागरिक तरी कसे राहणार असा सवाल अनिल करंजे यांनी करत आपली अस्तित्वाची आता लढाई सुरू झाली असून आपण आचरा गावचे भूमिपुत्र आहोत हे सिद्ध करण्यासाठी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी व्यापक लढा उभारण्याची वेळ आल्याचे स्पष्ट केले.
देवस्थान इनाम जमिनीमुळे शेतकरी नामशेष होणार आहेत. त्यांचे अधिकार अधिकार नाहीसे होणार आहेत. प्रांताच्या अशा निकालामुळे जमिनी देवस्थानकडे वर्ग होणार आहेत. आज ९० लोकांना नोटिसा आल्या. उद्या गावालाच नोटिसा काढून कनिष्ठधारक व कुळे नष्ट केली जातील. १७२० इनाम मिळाले होते आणि सातबारावर देवस्थान इनाम म्हणून १९७४ नाव लावले मग २५४ वर्षांनी हे नाव लागले कसे असा सवाल सांबारी यांनी ग्रामसभेत केला. १९७४ पूर्वीच्या सातबारावर कनिष्ठधारक त्यानंतर कुळ व इतर हक्कात देवस्थान अशी स्थिती असताना १९७४ मध्ये इतर हक्कात रामेश्‍वर वरिष्ठ धारणकर्ता झाला कसा असा सवाल करत सांबारी यांनी ही गंभीर बाब असून यावर ग्रामस्थांनी आपला लढा उभारला पाहिजे. अन्यथा सर्वजण नामशेष होतील अशी भीती व्यक्त केली. देवस्थान जमिनप्रश्‍नास पूर्णपणे देवस्थान कमिटी जबाबदार असल्याचा आरोप या ग्रामसभेत देवस्थान कमिटीचे माजी विश्वस्त अशोक गावकर यांनी केला. आपण या देवस्थान कमिटीत होतो. अडीच वर्षे काम केले त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण या कमिटीतून बाहेर पडलो. आज देवस्थान कमिटीत देवस्थानशी संबंध नसणारी माणसे आहेत. मुंबईवासी असणारे आज कमिटीदार झाले आहेत. हा सारा खेळ हीच कमिटी घडवत असल्याचा आरोप गावकर यांनी करत याविरुद्ध आर या पारची लढाई देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आता जो लढा उभारणार तो भुमिपुत्राचा लढा असणार असल्याचा उल्लेख करंजे यांनी करत यात कोणत्याही राजकीय पक्षाच्या हस्तक्षेप नको असे सांगितले. आजपर्यंत सगळ्या आमदारांना भेटलो राजन तेली, दीपक केसरकर, नारायण राणे, तसेच तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचेही देवस्थानप्रश्‍नी लक्ष वेधले. मात्र यावर न्याय मिळाला नाही. पश्‍चिम महाराष्ट्राच्या देवस्थानच्या ट्रस्टवर देशावरील आमदार खासदारांची लॉबी आहे. यांनीच देवस्थानच्या जमिनी हडप केल्या म्हणूनच ही लॉबी देवस्थान संदर्भात कोणताही निर्णय द्यायला बघत नाही आणि आपले कोकणचे आमदार त्यांच्यापुढे टिकत नाहीत. आमदार कमी पडतात म्हणूनच बदल
घडत नाही. म्हणूनच आपला प्रश्‍न आपणच उचलून धरल्याशिवाय पूर्ण होणार नसल्याचे अनिल करंजे यांनी सांगत येणार्‍या निवडणुकीत गावाने एकमुखी मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठराव मांडला. यावेळी प्रांताधिकारी यांनी दिलेल्या निर्णयावर अपील करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
देवस्थान जमिनप्रश्‍नी तीव्र लढा देण्यासाठी आचरा ग्रामसभेत एक गावसमिती गठित करण्यात आली आहे. या कमिटीचे अध्यक्ष अनिल करंजे यांची निवड करण्यात आली. यात सदस्य म्हणून सुहास सावंत, समीर ठाकूर, महेश गावकर, विनायक परब, प्रदीप पेडणेकर, सारंग, प्रमोद वाडेकर, चंदन पांगे, वामन आचरेकर, नितीन घाडी, श्रीकांत सक्रू व सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची निवड करण्यात आली. ही समिती आचरा गावच्या प्रत्येक वाडीवर सभा घेऊन पोटसमित्या तयार करून पूर्ण आचरा गावाचा एकत्रित लढा उभा करणार आहे.

\