सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार ः राजन तेली

2

सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे, येथील महिलांना आणि युवकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. सर्वजण स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत, येथील पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे,असे स्वप्न उराशी बाळगून गेले काही दिवस माझा प्रवास सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केले.
श्री. तेली यांचा वाढदिवस आज होत आहे. या निमित्ताने श्री. तेली यांनी ब्रेकींग मालवणीला खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या संकल्पना विषद केल्या. यात जिल्ह्याचा विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील असा शब्द यावेळी त्यांनी दिला. श्री. तेली म्हणाले, सुदैवाने आज मी राज्यात आणि देशात सर्वात बलशाली असलेल्या भाजप पक्षात आहे. या पक्षाच्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणात विकास झाला. तोच पायंडा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू ठेवला. आज सावंतवाडी मतदार संघ आणि पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास असे स्वप्न उराशी बाळगून माझा प्रवास सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत असताना मला सावंतवाडी विधानसभा संघ निवडणुक लढविण्याबाबत सुचना केल्या होत्या. याबाबत त्यांच्या आदेशाची परिपूर्ती व्हावी, त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून माझा पुढील प्रवास सुरू आहे. राजकारण करत असताना राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देवून सर्वसामान्य माणूस, महिला, युवक-युवतींच्या चेहर्‍यावर समाधान दिसले पाहिजे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत या दृष्टीने आपले नेहमीच प्रयत्न सुरू आहेत. एखादा विकासाचा प्रयत्न होत असेल तर त्याला आडकाठी करण्याचा प्रयत्न आपल्याकडून कधीच झाला नाही. त्यामुळे सर्वसामान्य मतदार माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. गेल्या काही महिन्यात सावंतवाडी विधानसभा मतदार संघात भाजपा भक्कमपणे उभी राहू शकली याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे माझ्यावर आणि पर्यायाने भाजपवर विश्वास ठेवणार्‍या मतदारांना हक्काचा रोजगार, स्वयंरोजगार देण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत.
शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या विविध योजना, आरोग्य सुविधा, रोजगाराभिमुख कार्यक्रम, मुद्रा योजना अशा विविध योजना लोकांपर्यंत पोहोचून ती व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी माझे प्रयत्न नेहमीच राहिले आहेत. मतदार संघात वेगवेगळे उपक्रम राबविण्याबरोबरच येथील सामाजिक, शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात आपण भरीव योगदान दिले आहे.
सर्वसामान्य माणसाचे काम केल्यानंतर किंवा त्याच्या गरजेला धावून गेल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावर दिसणारे हास्य हिच माझ्या जीवनाची प्रेरणा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांसाठी काम करावे आणि त्या माध्यमातून त्यांना आनंद द्यावा यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपमधून सावंतवाडी विधानसभा मतदार संघात मी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतू पक्षाकडून संधी मिळाल्यास त्याचा नक्कीच मी विचार करेन असा विश्वास श्री. तेली यांनी व्यक्त केला. आपल्यासोबत जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी दिलेल्या पाठबळामुळे सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात भाजपा सक्षमपणे उभी राहू शकली. मागच्या निवडणुकात यश मिळवू शकली असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात होणार्‍या निवडणुकातसुद्धा भाजपाची ताकद दुप्पट दिसेल. जास्तीत जास्त जागा या भाजपच्या ताब्यात असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

17

4