सावंतवाडीतील घटना:परिसरातील धोकादायक झाडे तोडण्याची मागणी…
सावंतवाडी ता.२५: येथील धान्य गोदामाच्या इमारतीवर भलेमोठे झाड कोसळून इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर आत मध्ये ठेवण्यात आलेले काही धान्य भिजले आहे.ही घटना आज सकाळी उघडकीस आली.हे झाड रात्री पडले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
याबाबतची माहिती मिळताच पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते झाड बाजूला करण्यात आले.येथील शासकीय पर्णकुटी विश्रामगृहाच्या संरक्षक भिंतीला हे झाड लागून होते.रात्री झालेल्या मुसळधार पावसात ते झाड पडल्याचा अंदाज महसूल विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.त्याठिकाणी असलेल्या जुन्या जिल्हा न्यायालयाच्या इमारती परिसरात अशाच प्रकारे मोठी व जीर्ण झालेली झाडे आहेत.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.परिणामी याची तात्काळ दखल घेऊन नगरपालिकेने किंवा संबंधित प्रशासनाने ही धोकादायक झाडे तोडून टाकावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.