संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामुळे गावांचा कायापालट…

152
2

अशोक बागवे ; उत्कृष्ट प्रभाग, चंदेरी कार्ड वितरण समारंभ उत्साहात…

मालवण, ता. २५ : काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर होता. मात्र संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू झाल्यानंतर गावात स्वच्छतेविषयी चांगली जनजागृती झाली. गेल्या काही वर्षाच्या अथक मेहनतीमुळे तालुका हागणदारी मुक्त झाला आहे. या अभियानामुळे गावचा कायापालट होण्यास मदत मिळाली आहे. त्यामुळे यापुढेही गावच्या स्वच्छतेत सर्व गावांनी सातत्य राखायला हवे असे प्रतिपादन पंचायत समितीचे उपसभापती अशोक बागवे यांनी येथे केले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या उत्कृष्ट प्रभाग व चंदेरी कार्ड वितरण समारंभ दैवज्ञभवन येथे झाला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर, अधीक्षक अरविंद घाडी, आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर, पाणी व स्वच्छता समन्वयक नीलेश मठकर, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी प्रभाकर जाधव यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते.
तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांच्यासाठी शिर्डी येथे सरपंच महापरिषद होणार आहे. ही सरपंच परिषद एक चांगली संधी असून ती दवडू नका. या परिषदेस सर्व सरपंच, उपसरपंच यांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. बागवे यांनी केले. यावेळी राजू परुळेकर यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ प्रभाग स्पर्धेत यश मिळविलेल्या ग्रामपंचायतींना चषक तसेच चंदेरीकार्ड मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

4