सायन मुंबई संघाचे मालिकेवर वर्चस्व…

2

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मालवण संघाचा ६६ धावांनी पराभव ; अ. शि. देसाई टोपीवाले शिल्ड क्रिकेट स्पर्धा…

मालवण, ता. २५ : येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सुरू असलेल्या अनंत शिवाजी देसाई टोपीवाले शिल्ड लेदर बॉल स्पर्धेच्या आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सायन संघाने टीएसए मालवण संघाचा ६६ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. १९१ धावांचा पाठलाग करताना मालवण संघ केवळ १२४ धावाच करू शकला. त्यामुळे या मालिकेवर सायन मुंबई संघाने आपले वर्चस्व राखल्याचे दिसून आले.
आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सायन मुंबई संघाने मर्यादित ३५ षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात १९० धावा फटकावल्या. देवांग गुप्तांने चोफेर फटकेबाजी करताना ९ चौकांराच्या मदतीने नाबाद ७९ धावा केल्या. आकाश संगळे याने ४ चौकारांच्या मदतीने ३० धावा, जय गोमने ३ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. मालवण संघाच्या भावेश केरकरने ३८ धावात २ तर यश धुरी, रोहन मालंडकर यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
१९१ धावांचे उद्दिष्ट घेऊन मैदानात फलंदाजीस उतरलेला टीएसए मालवण संघाच्या फलंदाजांना सायन संघाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करताना धावा करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे मर्यादित ३५ षटकात मालवण संघ पाच गडी गमावून केवळ १२४ धावांपर्यंत पोहचू शकला. यात आर्यन वाक्करने २ चौकारांच्या मदतीने ३४ धावांचे योगदान दिले तर भावेश केरकरने ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ३७ धावा केल्या. मात्र ते संघास विजय मिळवून देऊ शकले नाही. त्यामुळे सायन संघाने ६६ धावांनी दुसरा विजय साकारत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. सायन संघाच्या अमरजित सिंगने आजही भेदक गोलंदाजी करताना २७ धावात दोन गडी बाद केले. त्याला विनायक पवार, साहिल खरात, ओम साई यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत चांगली साथ दिली.

252

4