जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे ८ व ९ फेब्रुवारीला कुडाळ येथे आयोजन…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.३०: जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने एफ.सी बायर्न कप जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धा १४ वर्षाखालील फक्त मुलासाठी ८ ते ९ फेब्रुवारीला वा. स विद्यालय माणगांव ता. कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा करिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल कलब बायर्न म्युनिक जर्मनी यांचेशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झालेला असून राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल व फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यसाठी तसेच योजनाबध्द प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व बायर्न क्लब, जर्मनी यांच्या करारानुसार क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यसाठी राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा, विभाग व राज्य अशा क्रमाने स्पर्धा आयोजन होणार असून राज्य स्पर्धेतून एकूण 20 खेळाडूंची निवड करुन त्यांना म्युनिक, जर्मनी येथे जाणे येणे, तेथील निवास, प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे.

वयोगट 14 वर्षाखालील मुले फक्त, जन्मदिनांक दि. 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेला असवा. स्पर्धा दिनांक दि. 8 ते 9 फेब्रुवारी 2023 रोजी, स्पर्धाचे स्थळ, वा.स. विद्यालय माणगांव ता. कुडाळ जि.सिंधुदुर्ग, विजय शिंदे 8208882591 वर संपर्क करावा.

या स्पर्धेसाठी शालेय क्रीडा स्पर्धेसाठी सांघिक खेळासाठी उपलब्ध करुन दिलेला प्रवेश अर्ज दि. 7 फेब्रुवारी 2023 दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला सिंधुदुर्ग येथे ऑफलाईन पध्दतीने जमा करावेत. प्रवेश अर्जासोबत खेळाडूंचे आधार कार्ड, जन्मदाखला बोनाफाईड प्रमाणपत्र जमा करावे. प्रत्येक संघाने फुटबॉल खेळासाठी आवश्यक क्रीडा साहित्य, गणवेश व आवश्यक बाबी स्वत: सोबत आणाव्यात.

32

4