3 गाड्यांचा पाठलाग : दारू व्यावसायिकांच्या गाड्या असल्याचे स्थानिकांचे म्हणणे
माणगाव, ता. २५ : येथे भर बाजारात काल सायंकाळी चोर-पोलिसांचा खेळ स्थानिक ग्रामस्थांना अनुभवता आला. तब्बल तीन कारचा पाठलाग पोलिसांच्या गाडीने केला. सुसाट निघालेल्या या गाड्या उलट सावंतवाडीच्या दिशेने गेल्या. परंतु नेमके पोलिसांच्या हाती काय लागले याबाबत कळू शकले नाही. परंतु ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार त्या गाड्या दारू वाहतूक करणाऱ्यांच्या होत्या असे काही लोकांकडून सांगण्यात आले.
तालुक्यातील माणगाव बाजारामध्ये काल संध्याकाळी या प्रकाराच्या चर्चेला उधाण आले. अचानक तीन कार एकमेकाचा पाटलाग करत सुसाट निघाल्या. यात दोन स्विफ्ट कार व एक क्रेटा अशा तीन कारचा थरार पाहून सर्व लोकांच्या भुवया उंचावल्या. हा पाठलाग सावंतवाडीपर्यंत झाल्याची चर्चा माणगाव खोऱ्यात झाली चालु होती. या भरधाव जाणा-या
कारला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले. या वेळेत माणगाव बाजारात मोठी लोकांची वर्दळ असते. शाळेचे विद्यार्थी, वयोवृद्ध, पादचारी, वाहन चालक अशी रहदारी चालू असते. त्यामुळे या पाठलाग नाट्याची वेगळीच चर्चा रंगली. परंतु या गाड्या पकडण्यात आल्या की सोडून देण्यात आल्या याबाबत अधिक माहिती कळू शकली नाही.