Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापालकमंत्र्यांच्या आदेशाला ठेकेदार व प्रशासनाकडून केराची टोपली

पालकमंत्र्यांच्या आदेशाला ठेकेदार व प्रशासनाकडून केराची टोपली

परशुराम उपरकर:सुचनेनंतर सुध्दा मुंबई-गोवा महामार्गाचे प्रश्न अर्धवटच

कणकवली, ता.२५: हायवे खड्डेमुक्त करणार अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवली दौर्‍यात केली. त्याअनुषंगाने त्यांनी हायवे ठेकेदार आणि हायवे अधिकार्‍यांना फैलावर घेत महामार्ग सुरळीत ठेवण्याचे आदेशही दिले. तसेच सज्जड दम देखील दिला. परंतु हायवे ठेकेदार आणि हायवे अधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. तसेच केसरकर यांची फसवेगिरी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. अशी टीका मनसेचे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी आज केली.
कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत शैलेंद्र नेरकर, संतोष सावंत उपस्थित होते.
उपरकर म्हणाले,महामार्ग चौपदरीकरण संदर्भात पालकमंत्री केसरकर यानी 30 जून रोजी बैठक घेऊन महामार्गाचे काम होणार असल्याचे सांगत सर्व यंत्रणेला आपण सज्जड दम देऊन ठेकेदारावर कारवाई करणार अशी वक्तव्ये करून महामार्ग पाहणीचा स्टंट करून कणकवलीवासियांची व महामार्ग लगतच्या सर्वच तक्रारदारांची फसवणुक केली. पाहणीच्या बातम्या आणि फोटो आले आणि केसरकरांचे काम संपले. जे काम केसरकरांनी मार्च महीन्यामध्ये म्हणजेच पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक होते त्याकडे दुर्लक्षच केले. महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींची जाणीव करून घेणे व कामाला एप्रिल-मे मध्ये सुरवात करण्याची गरज होती. मात्र पालकमंत्र्यानी जनतेला फसविले असून करारामध्ये खड्डे भरण्याबाबत नोंद असतानाही हे काम ठेकेदाराने केले नाही. जनतेचा झालेला उद्रेक व सर्वपक्षीयांची एकजूट या दबावामुळे कामाला सुरवात झाली. मात्र याचेही श्रेय पालकमंत्री हेच घेत असून जनतेची दिशाभूल आणि फसवणुक करण्याचे काम पालकमंत्री करत असल्याचा टोला उपरकर यानी लगावला.
घोषणांचे काय झाले ?
पालकमंत्री केसरकर यानी कणकवलीतील 1 हजार बीएसएनएलचे फोन सुरू करण्याचे आदेश दिले होते. ते फोन सुरू झाले का?, महामार्गावरील खड्डे भरण्याच्या सूचना केल्या होत्या खड्डे भरले का? असा सवाल करताना उपरकर म्हणाले, खारेपाटण ते पत्रादेवी या दरम्यान खड्ड्यांचे सांम्राज्य निर्माण झाले आहे. केसरकरांनी दिलेल्या आदेशाला प्रत्यक्षात प्रशासन व ठेकेदार यानी केराची टोपली दाखविली आहे. असे सांगताना ते म्हणाले, कोकण विभागाचे आयजी यानी खारेपाटण ते पत्रादेवी असा प्रवास केला. त्यामुळे केसरकर या आयजींकडुनच खड्ड्यांचा अहवाल घ्यावा असा उपरोधिक टोला लगावताना उपरकर म्हणाले, गेली साडेचार वर्षे जनतेचे प्रश्न सोडवू न शकलेले केसरकर हे केवळ घोषणा देण्यापुरतेच आहेत. 800 जणांना नियुक्ती पत्रे दिला का?, सेटॉपबॉक्स दिले का? असा सवाल करताना यावेळी पुन्हा गणपती विमानातून आणणार की प्रवाशांना आणणार असा सवाल करत आता केसरकरांचेच विसर्जन करण्याची वेळ जनतेवर आली असल्याचा टोला माजी आम.उपरकर यानी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments