Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानगरपंचायतीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला

नगरपंचायतीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला

रवींद्र गायकवाड,बंडू हर्णे यांची माहिती;95 लाखाच्या सीएसआर फंडाचे दाखवले होते आमिष

कणकवली, ता.25 ः सर्वसामान्य नागरिकांना लाखो रूपये मिळाल्याचे इमेल, एसमएसएस पाठवून दाखवून फसवणुकीचे प्रकार होतात. त्याच धर्तीवर कणकवली नगरपंचायतीलाही 95 लाख रुपयांचा सीएसआर फंड मिळणार आहे. त्याच्या डीपीआरसाठी 3 हजार 600 रूपयांची रक्कम आगावू भरा असे सांगून नगरपंचायतीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न एका भामट्याने केला. मात्र आम्ही सावध असल्याने हा प्रकार हाणून पाडला आहे. पुढील आठवड्यात कणकवलीत नवीन मुख्याधिकारी रूजू झाल्यानंतर त्या भामट्या विरोधात सायबर क्राईम आणि आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणार आहोत अशी माहिती कणकवलीचे उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड आणि नगरसेवक बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
येथील नगराध्यक्ष दालनात बंडू हर्णे, रवींद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत नगरपंचायतीचे बांधकाम सभापती संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, सामाजिक कार्यकर्ते अजय गांगण, सुशील पारकर आदी उपस्थित होते.
बंडू हर्णे म्हणाले, नगराध्यक्षांच्या दालनात 15 जुलै रोजी अनिरूद्ध पाटील नामक एक व्यक्ती नगराध्यक्षांकडे आली होती. त्याने नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी चर्चा करताना आपण इंडियन ऑइल कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. इंडियन ऑईल कंपनीने कणकवली नगरपंचायतीला 95 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव इमेलच्या माध्यमातून पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील कुडाळ, देवगड नगरपंचायतींना देखील इंडियन ऑइल कंपनी निधी देणार आहे. मात्र त्या नगरपंचायतींकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती अनिरूद्ध पाटील नामक भामट्याने दिली. याखेरीज 95 लाख रुपयांचा निधीच्या विनियोगाचे पत्र इमेलच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायतीला पाठवले असल्याची माहिती दिली.
नगराध्यक्षांनी याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली असता इंडियन ऑइल कंपनीकडून 4 जुलै रोजी सीएसआर फंडातून 95 लाख रुपये निधीचा मिळण्याबाबतचा मेल आला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही इतर नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या दालनात येत त्या पाटील सोबत चर्चा केली. यावेळी 95 लाख रुपयांच्या निधीतून होणार्‍या कामांच्या अंतिम मंजूरीसाठी 22 जुलै रोजी इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकार्‍यांची एक समिती कणकवलीत येणार असल्याचे त्याने सांगितले. तसेच या कामांसाठी नगरपंचायतीचा ना हरकत ठराव आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे नगराध्यक्षांनी त्याच दिवशी विशेष सभेचा अजेंडा काढला आणि 19 जुलै रोजी नगरपंचायतीची विशेष सभा झाली. यात उपस्थित सर्वच नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात कोणकोणती कामे घ्यावीत याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कामांचीही निश्‍चिती करण्यात आली.
22 जुलै रोजी इंडियन ऑइल कंपनीची समिती येणार म्हणून कणकवली नगरपंचायत प्रशासनाने सज्जता ठेवली होती. परंतु त्या दिवशी दुपारी अनिरूद्ध पाटील याने फोन करून समिती आज येणार नाही तर उद्या येणार असल्याचे कळविले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 23 जुलै रोजी देखील कुठलीच समिती आली नाही. तसेच अनिरूदध पाटील नामक भामट्याने आपला मोबाईल देखील बंद ठेवला आहे.

वारंवार पैसे मागून नगरपंचायतीची होणार होती फसवणूक
कणकवली नगरपंचायतीला 95 लाखाचा निधी मिळणार आहे. त्याच्या डीपीआरसाठी 3 हजार 600 रूपये भरा असा निरोप अनिरूद्ध पाटील याने 21 जुलै रोजी केला होता. सीएसआर फंडातून निधी देणारी कुठलीही संस्था अशी आगावू रक्कम भरून घेत नाही. त्यामुळे त्या भामट्याचा फोन आल्यांनतर आम्ही तातडीने इंडियन ऑईल कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला. त्यांनी इंडियन ऑईल कंपनीने कणकवली नगरपंचायतीला कुठलाही निधी दिलेला नाही. तसा इमेल पाठविलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच कणकवली नगरपंचायतीला आलेला ईमेल फेक असल्याचेही सांगितले. यानंतर ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायला सांगितले, त्या बँक अकाऊंटची माहिती घेतली असता ते अनिरूद्ध टेंबकर याच्या नावे असल्याचे समजले. त्यामुळे हा प्रकार फसवणुकीचा असल्याची बाब आमच्या लक्षात आली. डीपीआर तसेच इतर वेगवेगळ्या मार्गाने कणकवली नगरपंचायतीकडून हा भामटा निधी उकळणार होता. मात्र आम्ही त्याचा डाव हाणून पाडला आहे.
आता कणकवली नगरपंचायतीमध्ये नवीन मुख्याधिकारी रूजू झाल्यानंतर नगरपंचायतीची फसवणूक करण्याचा प्रयत्न अनिरूद्ध पाटील तथा अनिरूद्ध टेंबकर या भामट्या विरोधात विरोधात सायबर क्राईम आणि फसवणूक या प्रकरणी गुन्हा दाखल करणार आहोत अशी माहिती बंडू हर्णे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments