आजोळी आलेल्या नातवाचा दागिन्यांवर डल्ला…

274
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आजीची कणकवली पोलिसांत तक्रार;गुन्हा दाखल…

कणकवली, ता.25 ः आजोळी आलेल्या नातवाने आपल्या आजीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तालुक्यातील घोणसरी-पिंपळवाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी आजीने नातवा विरोधात आज चोरीची फिर्याद दाखल केली. याप्रकरणी आतिश साळसकर (वय 22) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चिपळूण फरशी तिठा येथे राहणारा आतिश साळसकर हा 5 जुलै रोजी घोणसरी-पिंपळवाडी येथील आपल्या आजीच्या घरी आला होता. पाहुणचार झाल्यानंतर त्याने आजीकडे बँक पासबुक, आधारकार्ड आदींची मागणी केली. परंतु आजीचे कागदपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे आतिश याने आपली आजी शारदा मारूती साळसकर (वय 65) हिला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. तसेच लाकडी पेटीत ठेवलेले बँक पासबुक आधार कार्ड, रेशनकार्ड याच्यासह 23 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ आणि रोख 9 हजार 595 रूपये घेऊन पसार झाला. दरम्यानच्या कालावधीत शारदा साळसकर हिने नातवाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सर्व कागदपत्र आणि दागिने आतिष साळसकर हा परत आणून देईल अशी अपेक्षा तिला होती. मात्र नातू अद्यापही परत न आल्याने दागिने आणि रोख रक्कम चोरी प्रकरणी फिर्याद नोंदवली. या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्याचे हवालदार दयानंद चव्हाण तपास करत आहेत.

\