उपक्रमशील शिक्षक उमेश खराबी यांच्या संकल्पनेतून साकारला अभिनव उपक्रम…
मालवण, ता. २५ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे मांडबा जुवा शाळेत ओळख रानभाज्यांची हा अभिनव उपक्रम प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक उमेश खराबी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षकांनी पालकांच्या मदतीने परिसरातील उपलब्ध रानभाज्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. मांडबा जुवा ही शाळा एका बेटावर असल्याने अशा प्रकारचा शालेय उपक्रम करणे ही कठीण गोष्ट होती. परंतु उमेश खराबी यांनी सर्व विद्यार्थी, ग्रामस्थांना सोबत घेत यशस्वी केली.
कुर्डू, शतावरी, घोट्याची वेल, फोडशी, टाकळा, भारंगी, अळू, पेवगा, करटुलं या भाज्यांची त्यांच्या औषधी गुणधर्मासह उमेश खराबी यांनी ओळख करून दिली. रानभाज्या आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर माहिती दिली. यात आयुर्वेदात अतिशय गुणकारी समजली जाणारी व दुर्मिळ असलेली शतावरी भाजीची अतिशय रुचकर व पौष्टिक भजी आणि सर्व रान भाज्यांचा वापर करून शाळेतील पालक सौ. पूर्वा खोत यांनी दुपारी शालेय पोषण आहारात मुलांना त्याचा लाभ दिला.