राष्ट्रवादीतून सावंतवाडीसाठी दोघे तर कणकवलीत एक इच्छुक

711
2
Google search engine
Google search engine

भास्कर जाधव यांची माहिती : वेंगुर्ल्यात मुलाखतीनंतर चित्र उघड

वेंगुर्ला, ता. २५ : राष्ट्रवादी पक्षातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ लढवण्यासाठी दोन उमेदवार तर कणकवली विधानसभा मतदारसंघ करण्यासाठी एक उमेदवार इच्छुक असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा निरीक्षक भास्कर जाधव यांनी आज येथे दिली. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आज वेंगुर्ला येथे घेण्यात आल्या. त्यानंतर श्री. जाधव पत्रकारांशी बोलत होते.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील जनता राष्ट्रवादीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील असा विश्वास श्री. जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले जनतेला आता निष्क्रिय व घोषणांचा पाऊस पाडणारे सरकार नको असून प्रत्यक्ष कृती करणारे व शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या जीवनामध्ये नवीन बदल घडवणारे सरकार पाहिजे. कोकणात भाजपा कुठेही नसून याठिकाणी सेना व काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. जरी सेना भाजप युतीमध्ये असले तरीही गेल्या पाच वर्षात कोकणातील सेनेचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपा सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी सेनेची कोंडी केली आहे. यामुळे विकास कामे ठप्प आहेत. तर ती कोंडी मोडण्याचे कौशल्यही सेनेकडे नाही. या दोघांच्या भांडणाशी जनतेचे काही देणेघेणे नसून यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीलाच जनता साथ देईल. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघ पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब, एम. के. गावडे, सुरेश गवस, प्रदेश उपाध्यक्ष अमित सामंत, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, रत्नागिरी जिल्हा बँक संचालक श्री. सुर्वे, तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, जिल्हा महिला कार्याध्यक्ष सरोज परब, शिवाजी घोगळे, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्यासाहित जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.