“झुटाक्सा” शोध पत्रिकेत नोंद:चार संशोधकांनी केले संशोधन
सावंतवाडी/दत्तप्रसाद पोकळे,ता.२६:
जैवसंपन्न आंबोलीत पालीच्या एका नवीन प्रजातीचा शोध लागला आहे.विशेष म्हणजे आंबोली परिसरात सर्रास आढळणाऱ्या या पालीची ओळख यापूर्वी सामान्य पाल अशीच होती.मात्र, चार संशोधकांच्या टीमने केलेल्या संशोधनात ही पाल एका नवीन प्रजातीमधील व दुर्मिळ असल्याचे दिसुन आले.प्राणी जगतातल्या सर्व नवीन शोधांची नोंद ठेवणाऱ्या “झुटाक्सा” या जागतिक पातळीवरील शोधपत्रिकेत आंबोलीतील नवीन प्रजातीबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.जैवविविधतेचा “ग्लोबल हॉटस्पॉट” अशी ओळख असलेल्या आंबोलीच्या जैव श्रीमंतीत या संशोधनाने अधिक भर पडली आहे.
आंबोलीत पालीची नवीन प्रजात आर.चैतन्य,ईशान अगरवाल,अपर्णा लाजमी,अक्षय खांडेकर यांनी शोधून काढली आहे.प्रसिद्ध वन्यजीव संशोधक डॉ. वरद गिरी यांचे नाव (Hemidactylus varadgirii) या पालीच्या नवीन प्रजातील देण्यात आले आहे.पालीची ही नवीन प्रजात आंबोलीत सर्वत्र दिसून येते, त्यामुळे तिला सामान्य म्हणूनच आतापर्यंत पाहिले जात होते.मात्र इतरांसाठी सामान्य असणाऱ्या या पालीचा समूह दुर्मिळ व नवीन आहे का,याबाबत कधीच संशोधन झाले नाही.आर.चैतन्य,ईशान अगरवाल,अपर्णा लाजमी,अक्षय खांडेकर हे आंबोलीत संशोधन करत असताना,या पालीमधील काही रूपात्मक बदल त्यांना दिसून आले.2018 मध्ये या पालीचे डीएनए व अन्य नमुने गोळा करून सखोल संशोधन केल्यावर पालीची ही प्रजात नविन व दुर्मिळ असल्याचे सिध्द झाले.आर चैतन्य, इशान अग्रवाल, अपर्णा लाजमी आणि अक्षय खांडेकर यांच्या संशोधनाचा संच जागतिक पातळीवरील प्रसिद्ध समीक्षक-पुनरावलोकन जर्नल “झुटाक्सा”मध्ये प्रकाशित झाला आहे.अति जैवसंवेदनशील आंबोलीला अनेक वन्यजीव तसेच सरपटणाऱ्या जीवांचा स्वर्ग म्हणून ओळखले जाते.यात आता या पालीच्या नवीन प्रजातीची भर पडली आहे.