चांदा ते बांदा योजना राबविण्यासाठी एक इंचही जमिन गहाण ठेवणार नाही

2

दिपक केसरकर : सावंतवाडीत आयोजित शेतकरी मेळाव्यात दिली हमी

सावंतवाडी, ता. २६ : चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून यांत्रिकीकरणावर भर देण्यात येणार आहे. मात्र अनुदान तत्वावर यंत्रे देताना कोणाची एक इंचभर जमिनसुद्धा गहाण ठेवणार नाही. आठ दिवसात अनुदान उपलब्ध करून दिले जाईल, अशी हमी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिली.
चांदा ते बांदा योजनेंतर्गत वाटप करण्यात येणार्‍या यंत्रे व विविध योजनांची माहिती देण्यासाठी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी आमदार पुष्पसेन सावंत, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, राजन पोकळे, प्रसाद देवधर, शुभांगी सुकी, मायकल डिसोजा, चंद्रकांत कासार, कृषी अधिकारी तसेच बँक अधिकारी उपस्थित होते.
यावेळी केसरकर म्हणाले, चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आधुनिक शेती करण्याचा पर्याय खुला झाला आहे. त्याचा फायदा येथील शेतकर्‍यांनी घ्यावा. योजनेचा लाभ देताना नाहक कागदपत्रे मागून बँकेच्या अधिकार्‍यांकडून अडवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. कर्जाच्या रक्कमेसाठी कोणाचीही जमिन गहाण ठेवली जाणार नाही. अनुदानासाठी शेतकर्‍यांना हेलपाटे मारावे लागणार नाही या दृष्टीने तरतुद करण्यात आली आहे.
वैभव नाईक म्हणाले, आमडोस येथील बँकेत 15 टक्के रक्कमेसाठी जमिन गहाण ठेवण्यासाठी अधिकार्‍याकडून सांगण्यात आले. हा प्रकार चुकीचा आहे. 75 टक्के रक्कम शासनाकडून मिळत असतानासुद्धा बँकेच्या अधिकार्‍यांकडून असे प्रकार होत असतील तर या योजना राबविताना अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार श्री. सावंत म्हणाले, या योजना राबवा, शेतकर्‍यांना बळकट करा. मात्र त्या अनुदानासाठी शेतकर्‍यांना हेलपाटे मारायला लावू नका. याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे. शासनाच्या काही योजना या दिखावू आहेत. सिलिंडरचे पैसे पूर्ण भरावे लागतात. अनुदान मिळते की मिळत नाही हा संशयाचा विषय आहे. त्यामुळे अशा गोष्टीत शेतकर्‍यांची फसवणूक न करता थेट अनुदान कसे देता येईल याबाबत प्रयत्न व्हावेत.

16

4