विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा राष्ट्रवादीत पुन्हा एकदा फुट

2

सुरेश गवस नाराज : दोन दिवसात राष्ट्रवादी सोडण्याचा दिला इशारा

सावंतवाडी, ता. २६ : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा राष्ट्रवादीत पुन्हा एकदा फुट पडली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांची तडकाफडकी हकालपट्टी करून प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकारामागे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा हात आहे. त्यांना जिल्हाध्यक्ष पद हवे आहे असा आरोप करून पक्षनिष्ठेला किंमत नाही. त्यामुळे आम्ही पक्ष सोडणार आहोत असा इशारा गवस यांनी दिला आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष श्री. गवस यांची 24 जुलैला जिल्हाध्यक्ष पदावरून प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. पक्षाच्या मते त्यांची बढती असली तरी हा सर्व प्रकार म्हणजे हकालपट्टी आहे असा आरोप श्री. गवस यांनी केला आहे. आपल्या पदावर आपली नेमणूक होण्यासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले इच्छुक आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात जिल्ह्यात म्हणावे तसे काम झाले नाही असे सांगून भोसलेंनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. त्याला काही लोकांनी खतपाणी घातले. त्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे, असा आरोप गवस यांनी केला आहे. आपण याबाबत काही बोलणार नाही. सद्यस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीत पक्षनिष्ठेला किंमत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात पत्रकारांसमोर जाहीर भूमिका मांडून आम्ही राष्ट्रवादीला रामराम करणार आहोत असा इशारा त्यांनी ब्रेकींग मालवणीशी बोलताना दिला.
श्री. गवस हे शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. परंतू त्यांच्या नेमणुकीमुळे भोसलेंसह एक गट नाराज होता. त्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

9

4