दीपक केसरकर; नाबार्ड विभागाकडे ४ कोटी रुपयांचा प्रस्ताव…
दोडामार्ग/सुमित दळवी, ता.२६: तालुक्यातील प्रलंबित असलेल्या अत्यंत महत्वाच्या आशा हेवाळे पुलाचा प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे.नाबार्ड २५ अंतर्गत या पुलासाठी सुमारे ४ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्याच्या नाबार्ड विभागाकडे पाठविण्यात आला असून यावेळी शंभर टक्के हेवाळे पुलाचा प्रश्न सुटेल अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संदीप देसाई व हेवाळे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिली आहे.
हेवाळे पुलासाठी गेली ३ वर्षे अहोरात्र मेहनत घेणारे हेवाळे गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी हेवाळे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री केसरकर यांची मुंबई येथील मंत्रालयात जाऊन भेट घेतली. व प्रलंबित हेवाळे पुलाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी लक्ष वेधत तसा आग्रह धरला. यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी हेवाळे पुलासाठी संदीप देसाई व त्यांचे सहकारी तसेच ग्रामस्थ यांचे सुरू असलेले प्रयन्त व पाठपुरावा यामुळे सदर पुलासाठी नाबार्ड योजनेतून निधी मिळावा याकरिता प्राधान्याने सदर प्रस्ताव नाबार्डकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत हेवाळे मोठ्या पुलाचा प्रश्न मार्गी लागेल त्यासाठी आवश्यक रु. ३८५ लक्ष रकमेचा प्रस्ताव नाबार्डच्या अप्रायझर कमिटीकडे पाठविण्यात आला असून तो शंभर टक्के मंजूर होईल, इतकेच नव्हे तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून नाबार्ड अंतर्गत हेवाळे पूल कामाला प्रथम प्राधान्य देण्यात आल्याने हेवाळे यावर्षी निश्चित मंजूर होईल अशी ठाम ग्वाही दिली आहे. तसेच चालू वर्षी हेवाळे गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दलही संदीप देसाई व त्यांचे सहकारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे. नाबार्ड अंतर्गत प्रस्तावित पुलाबाबतचे पत्रही देसाई व ग्रामस्थ यांना दिले आहे. यावेळी संदीप देसाई यांचे समवेत माजी पोलीस पाटील सूर्यकांत देसाई, मधुसूदन गवस, अनंत देसाई, दयानंद गवस, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी संजय नाईक, केंद्रे येथील ग्रामस्थ प्रकाश गावडे आदी उपस्थित होते.