12 हजार 500 रुपयांचे घरगुती साहित्य लंपास
कणकवली,ता. २६ : कणकवली तालुक्यात चोरट्यांकडून घरफोडीचे सत्र सुरूच राहिले आहे. फोंडाघाट हवेलीनगर येथील सूर्यकांत बाळकृष्ण सावंत यांच्या घरातील साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. काल (ता.25) सायंकाळी साडे चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 8 हजार रूपये किंमतीचा एलईडी टीव्ही, 800 रूपये किंमतीची गॅस शेगडी, 300 रूपये किंमतीच्या दोन प्लास्टिक खुर्ची, 2 हजार रूपये किंमतीचा लाकडी टी पॉय, एक छोटी चांदीची गणपतीची मूर्ती, रोख पाचशे रूपये असा एकूण 12 हजार 500 रूपये किंमतीच्या ऐवजाचा समावेश आहे.
फोंडाघाट हवेलीनगर येथील सूर्यकांत बाळकृष्ण सावंत हे मुंबईला वास्तव्यात असतात. तर फोंडाघाट येथील घरी ते अधून मधून येत असतात. तर घराची देखभाल त्यांचे फोंडाघाट येथील भाऊ
अशोक सावंत हे करतात. अशोक हे काल (ता.25) सायंकाळी साडे चार वाजता पाण्याची टाकी भरण्यासाठी सूर्यकांत सावंत यांच्या घरी गेले होते. तेव्हा घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. तसेच आतील लोखंडी कपाट फोडण्यात आले होते. तसेच इतर ऐवज देखील लंपास झाला होता. आज सूर्यकांत सावंत हे मुंबईहून गावी दाखल झाले आणि त्यांची या चोरीची फिर्याद येथील पोलिस ठाण्यात दिली.