Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआमदार बदलल्यानंतरही समस्या कायम...

आमदार बदलल्यानंतरही समस्या कायम…

खड्ड्यातून बाप्पाला आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे यंदा बाप्पाच करेल विसर्जन ; परशुराम उपरकर…

मालवण, ता. २६ : साडेचार वर्षाच्या काळात सत्तेतील आमदार, खासदार, पालकमंत्री जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले. साडे चार वर्षापूर्वी येथील मतदारांनी मोठ्या विश्‍वासाने आमदार बदलला. मात्र आमदार बदलल्यानंतरही जनतेच्या समस्या कायमच असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधार्‍यांनी चार वर्षात गणपती बाप्पाला खड्ड्यातून आणले आजही तीच परिस्थिती कायम असून खड्ड्यातून आणणार्‍या सत्ताधार्‍यांचे गणपती बाप्पाने यंदा विसर्जन करावे अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, शैलेश अंधारी, भारती वाघ, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, पास्कोल रॉड्रिक्स, गुरू तोडणकर, अल्बर्ट रॉड्रिक्स, श्री. आडकर, राजू गिरकर, हर्षल मालंडकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. उपरकर म्हणाले, जिल्ह्यासह येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बिकट आहे. ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी देणार असे आश्‍वासन देऊन साडे चार वर्षाचा कालावधी उलटला मात्र एकही वैद्यकीय अधिकारी सत्ताधारी उपलब्ध करून देऊ शकले नाही. परिणामी एकच वैद्यकीय अधिकारी सेवा बजावत आहे. शहरात स्वाईन फ्लू सारखे रुग्ण आढळल्यास त्याला उपचाराअभावी मुंबईला पाठवावे लागते यावरून आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात पालकमंत्री अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
रस्त्यांचीही दुर्दशा झाली असून गेल्यावर्षी केलेल्या रस्त्यांवर पहिल्याच पावसात खड्डे पडले आहेत. लोकप्रतिनिधीच ठेकेदार असल्याने विकासकामांचा दर्जा घसरला आहे. सत्ताधार्‍यांनी चार वर्षात गणपती बाप्पाला खड्ड्यातून आणले, यंदाही तीच परिस्थिती कायम असल्याने बाप्पाला खड्ड्यातून आणणार्‍यांचे गणपती बाप्पानेच यंदा विसर्जन करावे अशी टीका उपरकर यांनी केली. मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी येथे येऊन आमदार वैभव नाईक यांच्यामुळे मच्छीमारांच्या प्रश्‍नांना न्याय मिळाल्याचे सांगितले खरे परंतु आमदारांनी किती प्रश्‍न सोडविले हे येत्या मत्स्य हंगामात मच्छीमारांना समजून येईलच. देवबागला २२० कोटींचा बंधारा दोन वर्षांपूर्वी मंजूर केला गेला त्याचे काय झाले? केवळ दोन डंपर दगड टाकले म्हणजे बंधार्‍याचे काम होणार का? असा प्रश्‍न उपस्थित करत सत्ताधारी जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या विविध समस्यांसदर्भात आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असून जनतेसोबत येत्या काळात आंदोलने छेडली जातील असे श्री. उपरकर यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments