चांदा ते बांदा योजनेंचा लाभ घेऊन उन्नती साधावी : पालकमंत्री केसरकर

2

वेंगुर्ले, ता. २६ : चांदा ते बांदा योजनेतंर्गत वेंगुर्ले तालुक्यासह सिधुदुर्ग जिल्ह्याचा विकास नारळ बागायती अंतर्गत विविध मसाला पिक देणाऱ्या रोपे व कलमे यांच्या माध्यमातून होण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातून सातबारा अंतर्गत त्याची लागवड करावी. तसेच पर्यटनदृष्ट्या त्याची लागवड करुन पिकाच्या उत्पादनाबरोबरच पर्यटनातून आपली आर्थिक उन्नत्ती साधावी या दृष्टीकोनातून साडेतीन कोटी रुपयांचा निधी प्रादेशिक केंद्राला दिला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या या मसाला पिकांची लागवड करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले.
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ दापोलीच्या वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या ठिकाणी चांदा ते बांदा योजनेतंर्गत मसाला पिके,कलमे व रोपे वितरण कार्यक्रम पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपिठावर चांदा ते बांदा योजनेचे सदस्य डॉ.प्रसाद देवधर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, वेंगुर्ला तहसिलदार प्रविण लोकरे, वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.बी.एन.सावंत, वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, जिल्हा कृषी अधिक्षक एस.एन.म्हेत्रे, पंचायत समिती सभापती सुनिल मोरजकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात नारळ बागेत आंतरित पिके घेण्यासाठी काळीमिरी- ४० हजार, दालचिनी-१० हजार, कोकणतेज जायफळ-३४ हजार, हळद-आले मिक्स – ६ लाख रोपे, कोकम रोप – १० हजार अशी रोपे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा योजनेंतर्गत वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात उपलब्ध करुन दिलेल्या निधितून तयार केलेली होती. या कलम व रोपांचे प्रातिनिधिक वितरण पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. तसेच वेंगुर्ले तालुक्यात चांदा ते बांदा योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर देण्यात आलेल्या ७ इन्सुलेटेड व्हॅनचेही शुभारंभ यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. मालवणातही अशाच प्रकारच्या व्हॅन देण्यात आल्या आहेत. गोव्यामध्ये जो प्रश्न निर्माण झाला होता की, मासा ताजा गेला पाहिजे यासाठी इन्सुलेटेड व्हॅनमधून आणावा याचे उत्तर आम्ही कृतीतून दिले आहे. सुरुवातीला अशी संकल्पना होती की, इन्सुलेटेड बॉक्सेस द्यायचे. त्यापेक्षा अधिक सोईच्या व्हॅन असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यापुढे ७५ टक्के अनुदानावर या गाड्या प्राप्त होतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ताजे मासे ज्याप्रमाणे गोव्याला जातात त्याप्रमाणे आपल्या मार्केटमध्येही उपलब्ध होणार आहेत. सिधुदुर्गातील जी मच्छिमार्केट आहेत त्याच्यामध्ये माशे स्टोअर करण्यासाठी योजना आखण्यात आलेली आहे आणि त्यासाठी नगरपरिषदेंना कोल्ड स्टोरेज उपलब्ध करुन देणार आहोत. जेणेकरुन मच्छिमारांचे मासे ज्या शहरामध्ये जातील ते टिकून राहतील.
यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी चांदा ते बांदा योजनेंतर्गत ३०० कोटी रुपयांचा अखर्चिक निधी अद्यापही पडून आहे. त्यातून खुल्या वातावरणातील कोंबड्यांचा प्रकल्प, देशीगाईंचा प्रकल्प, काजू बोंड प्रक्रिया प्रकल्प तसेच अन्य फळांवर आधारीत ज्युस प्रकल्प, मासळी वाहतुकीसाठी मच्छिमारांसाठी इन्सुलेटेड व्हॅन, खाडी व समुद्र किनारी कोळंबी प्रकल्प, शेळ्यामेंढ्यांचा प्रकल्प, छोट्या स्वरुपातील लाकडांची व मातींची घरे, बाथरुम व स्वच्छतेसहीत बांधकाम करणे, गणेश मूर्तीकारांसाठी विविध स्वरुपाच्या मशिनरी, रापण संघांना ७५ टक्के अनुदानाने जाळी, महिला बचतगटांना मासे सुकविण्यासाठी ड्रायर, मत्स्यपालनासाठी पिजरे, मॅन्ग्रोव्ह हॅचरिज, भातशेतीसाठी विविध स्वरुपाच्या मशिनरी अशा अनेक विविध योजनांचा समावेश चांदा ते बांदा अंतर्गत करण्यात आलेला आहे. याकरीता महिला किवा पुरुष यांनी एकत्र येऊन त्यांनी गट स्थापन करुन आपला आर्थिक विकास साधावा असे आवाहन केले.या कार्यक्रमाला वेंगुर्ला शिवसेना तालुका प्रमुख बाळा दळवी, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर,माजी नगराध्यक्ष संदेश निकम, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, नगरसेवक सुमन निकम, माजी जि.प.सदस्या सुकन्या नरसुले, तालुका महिला आघाडी अध्यक्षा मंजुषा आरोलकर, नितीन मांजरेकर यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लाभार्थी शेतकरी व मच्छिमार उपस्थित होते.

25

4