Monday, November 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याब्रह्मनगरी - फोंडाघाट येथे स्वच्छता मेळावा संपन्न

ब्रह्मनगरी – फोंडाघाट येथे स्वच्छता मेळावा संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचा उपक्रम

फोंडाघाट,ता.२७: एकविसाव्या शतकात प्लास्टिक नावाचा भस्मासूर उदयाला आला असून हेच प्लास्टिक पर्यावरणाच्या नाशाला कारणीभूत ठरत आहे. आज अनेक वस्तूंच्या वेस्टनासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. प्लास्टिकची वेस्टने उघड्यावर फेकून दिली जातात. प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे पर्यावरण धोक्यात येते. परिणामी मानवी आरोग्याला हानी पोहोचते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने व क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाने संयुक्तपणे स्वच्छ भारत समर इंटर्नशिप कार्यक्रम – २०१९ राबविण्याचे ठरविले. या कल्याणकारी उपक्रमांमध्ये मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या एनएसएस विभागानेही सक्रिय सहभाग घेतला. या अभियाना करिता महाविद्यालयाने कणकवली तालुक्यातील ब्रह्मनगरी या गावाची निवड केली व विभागाने त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन जनजागृती मेळावा आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास अधिकारी श्री. चंद्रकांत चौलकर पाणी स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अभियांत्रिकी तज्ञ श्री. अमेय पाटेकर एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. बालाजी सुरवसे ब्रह्मनगरी ग्रामस्थ श्री. सहदेव सावंत श्री. ज्ञानेश चिंदरकर श्री. प्रवीण हिंदळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


अभियानाची सुरुवात स्वच्छताविषयक जनजागरण फेरी काढून करण्यात आली. यामध्ये ब्रह्मनगरीया गावातील विविध स्वयंसाह्यता समूहातील महिला, ग्रामस्थ, फोंडाघाट महाविद्यालयातील एनएसएसचे स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. स्वच्छ – सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बालाजी सुरवसे म्हणाले की, देशातील सर्व नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे. यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविले आहे. या अभियानासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून ब्रम्हनगरी गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सदरचे अभियान यशस्वी करावे. स्वच्छतेमुळे गावाचे आरोग्य चांगले राहणार असल्याने ब्रम्हनगरी येथील सर्व ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतील असा आशावाद प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी व्यक्त करुन या अभियाना संदर्भातील शासनाची, मुंबई विद्यापीठाची व फोंडाघाट महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाची भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे पाणी व स्वच्छता मिशन सिंधुदुर्गचे अभियांत्रिकी तज्ञ श्री. आमेय पाटेकर यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे ज्ञान महिलांना आवश्यक असून कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे याबद्दल त्यांनी सखोल माहिती दिली. ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे व्यवस्थित वर्गीकरण करून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती कशी करावी, याबाबत त्यांनी ग्रामस्थांना दिलेली माहिती अतिशय उद्बोधक स्वरूपाची होती. घरच्या घरी गांडूळ खताची निर्मिती करून स्वयंरोजगाराला चालना देता येऊ शकते शिवाय बायोगॅसचेही महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत श्री. अमेय पाटेकर यांनी मांडले. जगभरात भारत हा स्वच्छ देश म्हणून ओळखला जावा यासाठी केंद्राने राबवलेले अभियान महत्त्वपूर्ण असून ते यशस्वी करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत श्री. अमेय पाटेकर यांनी मांडले.
फोंडाघाटचे ग्रामविकास अधिकारी श्री. चंद्रकांत चौलकर यांनी स्वच्छतेच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा देशात आघाडीवर असल्याचे सांगितले ही आघाडी अशीच कायम ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता गटातील सदस्य व ग्रामस्थ आदींनी सक्रिय सहभाग घेतल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही. प्लास्टिकमुक्त गाव आणि शाैचालययुक्त गाव हे ब्रीद समोर ठेवून कार्य केल्यास हे अभियान नक्कीच यशस्वी होईल असे चौलकर म्हणाले. या महान कार्यात गावाच्या विकासासाठी फोंडाघाट ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले
मान्यवरांच्या मार्गदर्शनपर भाषणानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना तज्ञांनी समाधानकारक अशी उत्तरे दिली. तसेच यासंदर्भातील विविध शासकीय योजनांची माहिती दिली यावेळी फोंडाघाट महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी *पथनाट्य* सादर करून कचरा व मानवी आरोग्याच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. यावेळी फोंडाघाट महाविद्यालयाच्या एनएसएस स्वयंसेवकांनी घरातील टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू कशा बनवता येतील याविषयी मार्गदर्शन केले. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पासून बनवलेले वेगवेगळ्या वस्तू, कागदी पुठ्या पासून बनवलेल्या फोटो फ्रेम, मिठाई बॉक्स, कागदी पिशव्या जुन्या कपड्या पासून बनवलेल्या गोधड्या व पायपुसण्या इत्यादींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.फोंडाघाट महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवकांमधुन स्वच्छता दूत म्हणून निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे गणेश पवार (गटनेता) ऋतिका खरात, संजना प्रभावळकर, ओंकार राणे, दत्तात्रेय लाड, अक्षता चव्हाण, राजेश हुंबे, विशाल चव्हाण, सुयोग कदम, प्रतीक्षा तेली यांना यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. स्वच्छता दूत म्हणून निवड झालेल्या सर्व स्वयंसेवकांनी यावेळी स्वच्छ आणि आरोग्यसंपन्न भारत घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस स्वयंसेवक गणेश पवार याने केले तर आभार ब्रम्हगिरीतील ग्रामस्थ श्री. ज्ञानेश चिंदरकर यांनी मानले. कार्यक्रमाला ब्रम्हनगरी येथील ग्रामस्थ व स्वयंसहायता समूहाच्या महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments