असनिये कारीचे गोठण येथे सांबराची शिकार..

2

ओटवणे,ता.२७: असनिये कारीचे गोठण येथे सांबराची शिकार करून त्याचे अवयव नाल्यात फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.५ ते ६ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.अज्ञातांनी सांबराची शिकार करून त्याचे मांस काढुन नेले व उरलेले अवयव नाल्यात फेकले.याच नाल्यातून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणारी नळयोजना नेण्यात आली असून,पिण्याच्या पाण्यात किडे दिसून आल्यावर शिकारीचा हा प्रकार उघड झाला.
असनिये कारीचे गोठण येथे बारमाही वाहणारा धबधबा असून,या परिसरात बंधाराही उभारण्यात आला आहे.लगतच्या घनदाट जंगलात अनेक वन्यप्राण्यांचे वास्तव असून,अनेकदा पट्टेरी वाघाचे दर्शन ग्रामस्थांना झाले आहे.या शिवाय गवे,सांबर आदी प्राणीही या परिसरात आहेत.यामुळे या तसेच लगतच्या घारपी परिसरात शिकर्यांचा वावर असतो.कारीचे गोठण परिसरात ५ ते ६ दिवसांपूर्वी अज्ञात शिकार्यांनी सांबराची शिकार केली.सांबराचे मांस काढल्यावर पाय,मान व इतर अवयव जवळच्या नाल्यात फेकले.ज्या नाल्यात सांबराचे अवयव फेकण्यात आले,त्या नाल्यातून गावठणवाडी येथे नळयोजना नेण्यात आली आहे.सांबराचे अवयव कुजून नळाच्या पाईपमधून दूषित पाणी आल्यावर ग्रामस्थांनी नाल्यावर जाऊन पाहणी केली असता,नाल्यात सांबराचे अवयव फेकण्यात आल्याचे दिसून आले.
याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून संबंधित शिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान,हा प्रकार उघड होताच काही जणांनी नाल्यात फेकलेले सांबराचे अवयव बाहेर काढून लगतच्या जंगलात पुरले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.या प्रकाराची वनविभाग दखल घेणार का,असा सवाल उपस्थित केला जात आहे.

10

4