कुडाळात बिबट्याची शिकार…

427
2

कुडाळ, ता. २७ : असनियेे परिसरात सांबराची शिकार झाल्याची घटना ताजी असतानाच कुडाळ येथील दत्तनगर परिसरात चक्क बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या अंगावर गोळी लागल्याचे निशाण असल्यामुळे त्याचीसुद्धा शिकार झाल्याचा दावा वनअधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान याबाबतची नोंद कुडाळ पोलिस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबतची माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल विनय मयेकर यांनी दिली. ते म्हणाले, हे शिकार झालेले बिबट्याचे पिल्लू अडीच वर्षाचे आहे. त्याची बंदुकीच्या सहाय्याने शिकार झाली असावी. याबाबतची माहिती ओरोस कंट्रोल रुमच्या माध्यमातून कुडाळ वनविभागाला देण्यात आली. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी जावून पाहणी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर तो मृतदेह ताब्यात घेवून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार नेमका कोणी केला याची चौकशी सुरू आहे. त्यासाठी परिसरात सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. प्राथमिक दर्शनी ही शिकार आहे असा दावा त्यांनी केला आहे. याबाबतची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल प्रदिप कोकितकर, व्ही. एन. मयेकर, वनरक्षक सुर्यकांत सावंत, वनक्षेत्रपाल अमोल चिरमे आदींनी त्या ठिकाणी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे श्री. मयेकर सांगितले.

4