फरकाची रक्कम म्हणून वसुली : साई कल्याणकर यांची महसूलकडे मागणी
बांदा, ता. २७ : येथील टोलनाका परिसरात उत्खनन करण्यात आलेली माती ही खनिजयुक्त असल्याने फरकाची रक्कम म्हणून 489 कोटी रुपये संबंधित ठेकेदार कंपनीकडून वसूल करण्यात यावेत. तसेच ही माती चोरून नेणार्या नऊजणांकडून 38 कोटी रुपये वसुल करण्यात यावेत, अन्यथा त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान त्यांनी केलेल्या मागणीनुसार सोमवारी आपण संबंधितांना नोटीसा बजावू असे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. श्री. कल्याणकर यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, परिसरात झालेल्या बेकायदा उत्खनन प्रकरणी तहसिलदारांकडून संबंधित कंपनीला यापूर्वी 349 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र हा दंड आपल्याला मान्य असला तरी संबंधित क्षेत्रात असलेली माती खनिजयुक्त आहे. त्यात लोहखनिज, अॅल्युमिनीयम यासारखे धातू आहेत. त्यामुळे ती माती खनिजयुक्त असल्यामुळे तसा दंड आकारण्यात यावा. त्यापोटी 489 कोटी इतका फरकाची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावी तसेच तेथील माती तब्बल नऊजणांनी चोरून नेली आहे. त्यात एका भागासह अन्य खासगी नऊ जागांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधितांकडून दंडापोटी 38 कोटी वसुल करण्यात यावेत अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.