ज्येष्ठ नागरिक यापुढेही शिवसेनेच्या पाठीशी राहतील…

2

आम. वैभव नाईक ; उद्धव ठाकरे वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार…

मालवण, ता. २७ : शिवसेनेच्या कठीण काळात ज्येष्ठ नागरिकांची, शिवसेना कार्यकर्त्यांची चांगली साथ पक्षाला लाभली यामुळेच आमच्यासारखी नवीन पिढी घडली. या नवीन पिढीला घडविण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपले योगदान दिले. ज्येष्ठ नागरिक नेहमी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून येत्या काळातही त्यांची शिवसेनेला साथ राहील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला.
गवंडीवाडा भागातील वीज पुरवठ्याची समस्या येत्या आठ दिवसात कायमस्वरूपी दूर करण्याची कार्यवाही होईल. रास्त धान्याची जी समस्या ज्येष्ठ नागरिकांना भेडसावत आहे ती सोडविण्यासाठी येत्या सोमवारी तहसील कार्यालयात बैठक घेतली जाईल असे आमदार नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गवंडीवाडा राममंदिर येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ झाला. कार्यक्रमास आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, महिला तालुकाप्रमुख श्‍वेता सावंत, दीपा शिंदे, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर, सेजल परब, नयना पोयेकर, अंजना सामंत, विद्या फर्नांडिस, नीलम शिंदे, नंदा सारंग, मंदार ओरसकर, आतू फर्नांडिस, प्रवीण रेवंडकर, किरण वाळके, गौरव वेर्लेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
शहरातील वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी वीज उपकेंद्रासह भुमीगत वीज वाहिन्या टाकण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच ती पूर्ण होऊन वीज पुरवठ्याची समस्या सुटेल. अद्ययावत बसस्थानक, सुसज्ज बंदर जेटी आदी कामेही मार्गी लागत आहेत. जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनची सुविधा उपलब्ध झाली आहे. डायलिसिस सेंटरही लवकरच सुरू होणार आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने होणारी गैरसोय दूर केली असून येत्या सोमवारपासून ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ हजर होणार असल्याचे आम.नाईक यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाई गोवेकर, हरी खोबरेकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक करून बबन शिंदे यांनी केले.

17

4