बांधकाम विभाग आता तरी लक्ष देणार का? ; ग्रामस्थांकडून होतेय विचारणा…
मालवण, ता. २७ : कोळंब पुलाच्या समस्या दुरुस्तीनंतरही संपलेल्या नाहीत. पुलाखाली टाकलेला मातीचा भराव हटविण्यासाठी आणण्यात आलेली जेसीबी मशीन मातीचा भराव व दलदलीत खोलवर रुतून पडल्याची घटना आज घडली.
दरम्यान काही ग्रामस्थांनी त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करत बांधकाम विभाग आणि ठेकेदाराचा कारभार पहा असे सूचित केले आहे. जेसीबी मशीन रुतली मात्र सुदैवाने या घटनेत चालक बचावल्याची माहिती मिळाली
तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कोळंब पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र मर्यादित क्षमतेच्या वाहतूकीसाठीच पूल योग्य असल्याचा अहवाल बांधकामच्या वरिष्ठ विभागाने दिला आहे. दुसरीकडे पुलाखाली टाकलेला आलेला भराव आजही त्याच स्थितीत आहे. मालवणच्या बाजूने असलेली संरक्षक भिंत कोसळली असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक कामे अपूर्ण असताना आज दुपारी पुलाखालील बंधाऱ्याची माती काढण्यासाठी आलेला जेसीबी मातीतच अडकून पडल्याने बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या कार्य पद्धतीवर व कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बांधकाम विभाग आता तरी लक्ष देऊन कार्यवाही करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोळंब पुलाखालील मातीचा भरावा तत्काळ हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्यानंतर तहसीलदार अजय पाटणे यांनी तत्काळ मातीचा बंधारा हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावरील कार्यवाही झाली नाही. जो भराव मे महिन्यापूर्वी काढायला हवा होता पावसात काढण्यास सुरुवात केल्याने जेसीबी अडकल्याची घटना घडल्याचे बोलले जात आहे.