प्रमोद जठार यांचा इशारा : आठ दिवसांत महामार्ग सुस्थितीत होण्याची ग्वाही
कणकवली, ता. २७ : महामार्गावरील खड्डे आठ दिवसांत बुजविण्यात येतील अशी ग्वाही ठेकेदाराने दिलीय. या कालावधीत खड्डे बुजविण्याची कामे न झाल्यास ठेकेदार आमच्याकडून मार खातील असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे बाबा मोंडकर, जयदेव कदम, रवींद्र शेटये, संदेश सावंत पटेल आदी उपस्थित होते.
श्री.जठार म्हणाले, महामार्ग किंवा कुठल्याही खात्याचे अधिकारी हे सॉफ्ट टार्गेट असतात. ठेकेदाराच्या चुकीचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे आम्ही हायवे अधिकार्यांना नव्हे तर ठेकेदाराला काम करण्यास भाग पाडणार आहोत. सध्या सतत पाऊस होत असल्याने रात्री बुजविलेले खड्डे सकाळी पुन्हा निर्माण होत आहेत. तरीही पुढील आठ दिवसांत पावसाची उघडीप मिळाली तर सर्व खड्डे डांबरीकरणाने बुजविण्यात येतील अशी ग्वाही सिंधुदुर्गात चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दोन्ही ठेकेदारांनी दिली आहे. मात्र त्यांनी कामात कुचराई केली तर आम्ही त्यांना इंगा दाखवू
ते म्हणाले, महामार्गाच्या दूरवस्थेचा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडला. राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याबाबतचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही त्यांनी आपले स्वीय सहाय्यक अतुल खानोलकर यांच्याकडे दिली आहे. तर सिंधुदुर्ग भाजपच्यावतीने झाराप ते खारेपाटण या कामावर देखरेख आणि ठेकेदाराशी समन्वयाची जबाबदारी वाहतूक आघाडीचे शिशिर परुळेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.