बंदूक घेऊन फिरणार्‍या दोघांना पोलिस कोठडी

2

कणकवली, ता. २७ : मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदा बंदूक घेऊन फिरणार्‍या दोघांना ताब्यात घेऊन, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मध्यरात्री 1 च्या सुमारास फोंडाघाट पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषणाचे पोलिस कर्मचारी गस्त घालत असताना दुचाकीवरून जाणार्‍या या दोघांची चौकशी केल्यानंतर विनापरवाना बंदूक, काडतुसे तसेच कोणतीही कागदपत्र नसलेली मोटारसायकल आढळून आली होती.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस नाईक प्रसाद कामत यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक एस.एस.देसाई, हेडकॉन्स्टेबल जी.बी.कोयंडे, एस.एम.जाधव हे ओरोस ते कणकवली आणि तेथून फोंडाघाट येथे गस्त घालत असताना पेट्रोलपंपासमोर दुचाकी थांबविण्यात आली. यात दुचाकी सिद्धेश सुनील राणे (वय 19 रा.वाघेरी, गावठाणवाडी) हा चालवत होता. तर त्याच्या मंदार अनिल रेवडेकर (वय 34, रा.फोंडाघाट) हा बसला होता. यात रेवडेकर याच्या हातात बंदूक होती तसेच डोक्याला चार्जिंग बॅटरी लावलेली होती. यात पोलिसांनी बंदुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता कुठलाही परवाना नसल्याचे त्या दोघांनी सांगितले. तसेच दुचाकीची कागदपत्रे मागितली असती ती देखील आढळून नाहीत. दरम्यान या दोघांकडील पिशवीची तपासणी केली असता आत चार जिवंत काडतुसे आढळून आली. या दोहोंजवळ गैरकायदा बिगरपरवाना बंदूक आढळून आल्याने त्यांच्यावर भारतीय हत्यार अधिनियम कलम 3/25(1)(क) प्रमाणे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. या दोहोंना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

18

4