बंद पडलेल्या गाडीचा कचराकुंडी म्हणून वापर…

2

मालवण पालिकेच्या अनोखा उपक्रम ठरलाय चर्चेचा विषय…

मालवण, ता. २७ : अलीकडच्या दोन वर्षात स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाच्या निमित्ताने येथील पालिकेने शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने काही आश्वासक कामगिरी केली असली तरी शहरात काही ठिकाणी कचऱ्याचे दुखणे कायम आहे. अशा परिस्थितीत वर्षभरापूर्वी पालिकेची कचरा उचल करणारी एक जुनी गाडी मासळी मंडईच्या दर्शनी परिसरातच बंद पडल्यावर पालिका प्रशासनाने त्या गाडीची दुरुस्त न करता तेथेच ठेवली. सध्या बंदावस्थेत असलेल्या त्या गाडीच्या हौदाचा वापर कचराकुंडी म्हणून केला जात आहे.
नव्या कचरा गाड्यांमुळे पालिकेला जुन्या कचरा गाड्यांचा विसर पडला असून ही बंद पडलेली गाडी दुरुस्त करून वापरण्याऐवजी ती त्याच जागी सडत ठेवण्यातच पालिकेने धन्यता मानल्याचे दिसून येत आहे.
पालिकेच्यावतीने शहरात स्वच्छतेच्या दृष्टीने काही चांगली पावले उचलली आहेत. शहरात स्वच्छतेची मानसिकता रुजण्यास अजून बराच कालावधी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया राबविताना ठिकठिकाणी कचराकुंड्या, नवीन घंटागाड्या, नवीन कचरा गाड्या, कंत्राटी सफाई कामगार व रात्रीच्या वेळीही साफसफाई व कचरा उचल, कचरा वर्गीकरण व त्याची विल्हेवाट लावणे, कचरा डम्पिंग ग्राउंडचे नूतनीकरण अशी आश्वासक कामगिरी पालिकेने केली आहे. शहरात दररोज रस्त्यावरील तसेच घरोघरी कचरा उचलण्याचे कामही चांगल्या पद्धतीने होत आहे. परंतु शहरातील काही ठिकाणी कचऱ्याचे दुखणे कायम आहे.
वर्षभरापूर्वी मालवण पालिकेची एक कचरा गाडी मासळी मंडई येथे बंद पडल्यावर ती तेथेच ठेवली. या गाडीची कोणतीही दुरुस्ती न केल्याने ती त्याच ठिकाणी पडून आहे. याच दरम्यान पालिकेच्या ताफ्यात आठ नवीन कचरा गाड्या सामील झाल्याने या बंद पडलेल्या जुन्या गाडीचा पालिकेला विसर पडला. ही बंद पडलेली गाडी दुरुस्त करून ती स्वच्छतेच्या कामासाठी वापरणे शक्य होते. मात्र तसे कोणतेही प्रयत्न पालिकेकडून झाले नाहीत. त्यामुळे ती आता सडत आहे. मासळी मंडई परिसरात पडून असलेल्या या गाडीच्या कचरा गोळा करण्याच्या मागील हौदात स्थानिकांकडून कचरा टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या बेपर्वाई वृत्तीमुळे निर्माण झालेली ही नवीन कचराकुंडी शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

1

4