दुसरे जिल्हाप्रमुख संजय पडते; सावंतवाडी कणकवली मतदार संघाची जबाबदारी
कुडाळ, ता. २८ : मतदार संघापुरते संपर्क ठेवणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांना चांगलेच भोवले आहे. कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर त्यांच्यावरची जबाबदारी कमी करून जिल्ह्यातील कणकवली व सावंतवाडी या दोन मतदार संघाची जबाबदारी अखेर संजय पडते यांच्याकडे देण्यात आली आहे. ही निवड काल रात्री उशिरा करण्यात आली.
याबाबतचे वृत्त ब्रेकींग मालवणीने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. श्री. नाईक हे पक्षबांधणीसाठी पुरेसा वेळ देत नाही अशी कार्यकर्त्यांकडून नाराजी असल्याने त्या ठिकाणी अखेर दोन जिल्हाप्रमुख करण्याचा निर्णय पक्षाला घ्यावा लागला आहे. त्यानंतर आज ही निवड झाली आहे.
शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख श्री. नाईक हे आपला मतदार संघ वगळून अन्य ठिकाणी लक्ष देत नाहीत अशी अंतर्गत नाराजी शिवसैनिकात होती. त्यामुळे त्यांना बाजूला करून दोन जिल्हाप्रमुख द्यावेत अशी मागणी सावंतवाडीतील काही पदाधिकार्यांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार अंतर्गत सुरू असलेल्या शितयुद्धाला शमविण्यासाठी दोन जिल्हाप्रमुख नेमण्यासाठी पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांनी हिरवा कंदिल दिला होता. त्यानुसार नाईक यांच्याकडे असलेली जबाबदारी कमी करून त्यांच्याकडे फक्त त्यांच्या मतदार संघापुरती जबाबदारी ठेवण्यात आली आहे. तर कणकवली व सावंतवाडी विधानसभा मतदार संघात संजय पडते यांची निवड करण्यात आली आहे. श्री. पडते हे जुने शिवसैनिक आहेत. त्यांनी राणे समर्थक म्हणून राणेंसोबत शिवसेना सोडली होती. परंतू त्यानंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेत येणे पसंत केले होते. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जबाबदारी बजावली आहे. पक्षसंघटना बांधणीसाठी ते योग्य पद्धतीने काम करू शकतात. आगामी काळात होणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या संघटना बांधणीचा फायदा पक्षाला होऊ शकतो हे सर्व चित्र लक्षात घेवून रात्री उशिरा जिल्हाप्रमुख पदावर संजय पडते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर दुसरीकडे नाईक यांना फक्त मतदार संघाचे जिल्हाप्रमुख ठेवण्यात आले आहे.