आम. वैभव नाईक यांचा पाठपुरावा ; अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश…
मालवण, ता. २८ : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रिक्त असलेल्या पदावर वैद्यकीय अधिकारी म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विजयालक्ष्मी शानबाग यांची नियुक्ती झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ पद गेली बारा वर्षे रिक्त होते. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने हे रिक्त पद भरण्याची कार्यवाही झाली आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. शानबाग यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी आमदार नाईक यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देत त्यांचे स्वागत केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, किरण वाळके, सन्मेश परब, तपस्वी मयेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक दिवशी सुमारे १०० हून अधिक बाह्य रुग्णांची तपासणी केली जाते. सध्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील हे रुग्णांना सेवा देत होते. डॉ. शानबाग यांच्या नियुक्तीमुळे डॉ. पाटील यांच्यावरील ताण कमी होणार आहे. ग्रामीण रुग्णालय इमारतीलगत वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांसाठी निवासस्थाने उभारण्याचे काम सुरू आहे. दोन वैद्यकीय अधिकारी व सात कर्मचार्यांसाठी यात सुविधा आहेत. इमारतीचे काम पूर्ण झाले असून आतील खोल्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी आमदार नाईक यांनी यावेळी केली. येत्या दहा दिवसात हे काम पूर्ण करावे असे आदेश त्यांनी प्रशासनास यावेळी दिले.