विरोधकांनी राणेंना नाकारले : मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना स्वीकारण्याची वेळ
सावंतवाडी /अमोल टेंबकर.ता.२९: राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी राणेसमर्थक चालतील परंतु नारायण राणे नको अशी परिस्थिती निर्माण केली असली तरी,आज राणेंनी आपल्या खास मुशीतून तयार केलेल्या समर्थकांकडे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षाची महत्वाची पदे आहेत. त्यामुळे या सर्व राजकीय रस्सीखेचीत सिंधुदुर्गातील सर्वपक्षांची “दोरी”राणे समर्थकांच्या हातात आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि नारायण राणे हे समीकरण गेली अनेक वर्षे तयार झालेले आहे.विरोधी पक्षनेते,मुख्यमंत्री आणि अन्य मंत्रीपदे असताना राज्याच्या राजकारणात सिंधुदुर्गची वेगळी ओळख निर्माण करणारे हे दमदार नेतृत्व आज जरी काळाच्या काहीसे थोडेसे मागे पडले असले तरी राणेंच्या माध्यमातून तयार झालेले अनेक समर्थक आज अन्य पक्षांचे नेतृत्व करत आहेत.तसेच राणेंच्या संघटन कौशल्याच्या जोरावर स्वतःचे वेगळे अस्तित्व टिकवून आहेत. ते आज राणेंसोबत नसले तरी ते राणे समर्थकच म्हणून ओळखले जाणार आहेत.
राणेंचे एकेकाळचे कट्टर समर्थक असलेल्या संजय पडते यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला.त्यात राणेंनी राजकारणाच्या पलीकडे जावून तयार केलेले कार्यकर्ते आणि जोडलेली संघटना असे गणित काही लोकांकडून मांडण्यात आले. त्या समिकरणाचा विचार केल्यानंतर राणेंसोबत काही काळ खंदे समर्थक म्हणून वावरणारे अनेक जण आज अन्य पक्षाचे नेतृत्व करत आहेत.
लक्षवेधी ठरलेल्या या चर्चेमध्ये मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर, भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी भाजपा तालुकाध्यक्ष महेश सारंग, वेंगुर्ले भाजपा तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई,कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष संदेश पटेल,शिवसेना वैभववाडी तालुकाध्यक्ष मंगेश लोके,काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी काका कुडाळकर आणि बाळा गावडे या सर्व राणे समर्थकांची नावे आहेत.
आज जरी हे पदाधिकारी राणेंसोबत नसले तरी त्यांचे राजकारण आणि ओळख नारायण राणेंच्या भोवती फिरत असल्याची भावना अनेक सर्वपक्षीय कार्यकर्त्यासह नागरिकांतून व्यक्त केली जाते. त्यामुळे भविष्यात एखादा मोठा राजकीय भूकंप झाल्यास पुन्हा हे समर्थक राणेंसोबत गेले तर काही नवल वाटण्याची गरज नाही.