राजन तेली : आठवडाभरात अध्यादेश काढण्याचे मंत्री कुटे यांचे आश्वासन
कणकवली, ता. २९ : वैश्य-वाणी आणि वाणी यावरून गेले काही दिवस निर्माण झालेला वाद आता संपल्यात जमा आहे. वैश्य आणि वाणी हे दोन एकाच जातीचे आहेत. त्यामुळे त्यांना वाणी जातीचे म्हणून संबोधण्यात यावे तसेच या विषयावरून निर्माण झालेल्या तांत्रिक चुका लक्षात घेता हा वाद येथेच संपविण्यात यावा, असे आदेश कामगार (ओबीसी) मंत्री संजय कुटे यांनी दिले.
याबाबतची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिली. श्री. कुटे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार येत्या आठवडाभरात याबाबतचा अधिकृत अध्यादेश काढण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत आज मुंबई येथे बैठक झाली. या बैठकिला कुटे यांच्यासमवेत राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, बाळ बोर्डेकर, विजय खातू, सुनील खाडे, श्री. गांगण आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी या तांत्रिक चुकीमुळे गेले अनेक दिवस वैश्य म्हणून उल्लेख असलेल्या वाणी समाजाच्या बांधवांना दाखले मिळविताना अडचणी येत आहेत अशी नाराजी व्यक्त केली. 2014 मध्ये झालेल्या अध्यादेशानुसार पुन्हा हे प्रकरण आयोगाकडे पाठविण्यात आले होते. याबाबतची माहिती दिल्यानंतर उपस्थित समाजबांधवांनी येणार्या अडचणी कुटे यांच्या कानावर घातल्या. यात वैश्य व वाणी या दोन्ही एकच जाती आहेत. हिंदू वैश्य व वैश्यवाणी किंवा नुसते वाणी या तीनही जाती एकच असून तसाच जातींचा उल्लेख दाखल्यावर किंवा जातपडताळणीच्यावेळी आल्यास वाणी म्हणूनच संबोधण्यात यावे असे आदेश कुटे यांनी दिले. येत्या आठवडाभरात अधिकृत अध्यादेश काढला जाईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे गेली अनेक वर्षे भेडसावणारा जातीच्या दाखल्याचा प्रश्न आता सुटणार आहे, असा विश्वास श्री. तेली यांनी व्यक्त केला.