महाराष्ट्र राज्य पाॅवरलिफ्टींग चँपियनशिप स्पर्धा
सिंधुदुर्गच्या सुनेत्रा ढेरे व गणेश वायंगणकरना सुवर्ण पदक
वेंगुर्ले, ता. २९ : महाराष्ट्र राज्य पाॅवरलिफ्टींग असोसिएशन आयोजित सिनीयर, नौवासिस, पुरुष व महिला राज्य पाॅवरलिफ्टींग चँपियन स्पर्धा ठाणे वागळे इस्टेट येथे संपन्न झाली. यामध्ये सिंधुदुर्गच्या सुनेत्रा ढेरे व गणेश वायंगणकरना यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे.
हि स्पर्धा असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत राज्यभरातून ३०० पाॅवरलिफ्टींग खेळाडू विविध १५ गटातून सहभागी झाले.स्पर्घेतील पारितोषिक विजेत्या खेळाडूंचा नगरसेवक प्रकाश शिंदे, ठाणे असोसिएशन अध्यक्ष संभाजी सुर्यराव, रामदास खरात व मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य, कास्य पदके, सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला. सिंधुदुर्ग पाॅवरलिफ्टींग खेळाडूंचा संघाने सहभागी होत उत्कृष्ट कामगिरी बजावली. स. ह.केळकर महाविद्यालय, देवगडच्या गणेश वायंगणकर व प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक मिळविले. त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पाॅवरलिफ्टींग असोसिएशनचे सेक्रेटरी व कोच दिलीप नार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे व संघाचे महाराष्ट्र पाॅवरलिफ्टींग असोसिएशनचे अध्यक्ष पुष्कराज कोले, गुरुवर्य मधुकर दरेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष तथा जिल्हा पाॅवरलिफ्टींग उपाध्यक्ष दिलीप गिरप, राजू बेग, राज्य सेक्रेटरी भारत श्री सैंदल सोंडे, जाॅईंट सेक्रेटरी राजेश घाटवळ, सिंधुदुर्ग जिल्हा पाॅवरलिफ्टींग असोसिएशनचे डॉ. गणेश मर्गज, प्रविण नाईक, कल्पना सावंत, सिद्धेश नाईक, दिपक राऊळ, बाॅडी टेंपल असोसिएशनचे प्रविण गुरव, मंगेश घोगळे यांनी अभिनंदन केले आहे.