बबन साळगावकर यांचा सवाल: पगारी दलालांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही
सावंतवाडी ता.२९:पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमात बबनरावांच्या हातात सावंतवाडी सुरक्षित आहे असे म्हणणार्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना आताच मी अपयशी का वाटलो ? असा प्रश्न सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे पालिका सभेत व्यक्त केला.मी नेत्यावर टीका केली होती मात्र माझ्यावर काही पगारी दलालांनी टीका केली त्यामुळे त्यांच्याविरोधात बोलावेसे वाटत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सावंतवाडी पालिकेची मासिक सभा आज येथे झाली. या सभेत भाजपचे नगरसेवक आनंदी नेवगी यांनी पालकमंत्र्यांनी दिलेले पाच कोटी तुम्ही खर्च केले नाहीत असे सांगून त्यांनी तुमच्यावर अपयशी अशी टीका केली आहे याबाबत सभागृहात खुलासा करा अशी मागणी केली.याला उत्तर देताना श्री साळगावकर यांनी रोखठोक भूमिका मांडली.
ते म्हणाले शहराला दिलेले ५ कोटी कॉम्प्लेक्ससाठी दिले आहेत. कॉम्प्लेक्सचा खर्च लक्षात घेता ५० कोटी रुपयांची गरज आहे. ५ कोटी रुपयातील अडीच कोटी रुपये फक्त पाया भरण्यासाठी खर्च करावे लागणार आहे. मग उरलेल्या अडीच कोटी रकमेत कॉम्प्लेक्स कसे उभे राहणार हा प्रश्न आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना विस्थापित करावे असे मला वाटत नाही. गेल्या डिसेंबर महिन्यात माझ्याकडे ही रक्कम दिली होती. सहा ते सात महिन्यात ती कशी काय खर्च करू शकतो. जोपर्यंत योग्य ती रक्कम दिली जात नाही तोपर्यंत येथील व्यापाऱ्यांना विस्थापित करणे चुकीचे ठरले असते. त्यामुळे ती रक्कम मी कॉम्प्लेक्ससाठी खर्च केली नाही किंवा कॉम्प्लेक्सचे काम हातात घेतले नाही. ही वस्तुस्थिती आहे.
साळगावकर पुढे म्हणाले नियोजित कॉम्प्लेक्समध्ये दोन गुंठे जमीन ही पेट्रोल पंपासाठी राखीव ठेवण्यात आली होती. मागचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी कॉम्प्लेक्समध्ये पेट्रोल पंप नको अशी टीप्पणी घातली होती. परंतु केसरकरांनी आपल्या मैत्रीखातर पेट्रोल पंप त्याठिकाणी बांधण्यासाठी जागा ठेवली हे सर्व चुकीचे आहे. संबंधित पेट्रोल पंप मालकाची बाजूला जमीन आहे त्यांनी त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभारले आहे मग या ठिकाणी जागा ठेवण्याची गरज काय? असाही प्रश्न साळगावकर यांनी उपस्थित केला. आपल्यावर झालेल्या टीकेला मी उत्तर दिले पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर आपण बोललो मात्र त्याठिकाणी असलेल्या नगरसेवकांना काही माहीत नव्हते त्यामुळे ते या आरोपाबाबत अनभिज्ञ आहे.
या बैठकीत विरोधकांकडून श्री साळगावकर यांचा सत्कार करण्यात आला पालिकेला ५ कोटी रुपयाची बक्षिसाची रक्कम मिळण्यासाठी साळगावकर यांनी आंदोलन पुकारल्याने शासनाची त्याला दखल घ्यावी लागली त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव विरोधी नगरसेवक राजू बेग सुधीर आडिवरेकर व नासिर शेख यांनी मांडला.