महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण,स्वयंरोजगार व आरोग्य विषयक कार्यक्रम राबविणार : नूतन अध्यक्ष प्रार्थना हळदणकर
वेंगुर्ले. ता,३०: लायनेस क्लब ऑफ वेंगुर्ला यांचा पदग्रहण सोहळा झोन चेअरमन अवधूत चव्हाण, मालवण क्लब अध्यक्ष उदय घाटवळ व शपथप्रधान अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी नूतन वेंगुर्ले अध्यक्ष प्रार्थना हळदणकर यांनी महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण कराटे, स्वयंरोजगार व आरोग्य विषयक कार्यक्रम राबविणार असल्याचे जाहीर केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रार्थना हळदणकर यांना अध्यक्षपदाची सुत्रे देऊन नविन सदस्यांना शपथ देण्यात आली. यावेळी वेंगुर्लेतील समता बचत गटाच्या सर्व सदस्यांचा, दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल लायनेस परिवारातील कु. सिद्धार्थ जयंत भाटीया तसेच ब्लॅक बेल्ट परीक्षेत रत्नागिरी-सिधुदुर्गात प्रथम आल्याबद्दल कृष्णा पुंडलिक हळदणकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला लायनेसच्या माजी अध्यक्ष प्राची मणचेकर, खजिनदार कविता भाटीया, हेमा गावसकर, कर्पे, नीला यरनाळकर आदी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी तर आभार स्मिता कोयंडे यांनी मानले.