सावंतवाडी / दत्तप्रसाद पोकळे, ता. ३० : चौथ्या व्याघ्र गणनेचा अहवाल जाहीर करण्यात आला असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पट्टेरी वाघाचे अस्तित्व दर्शविण्यात आले आहे. या अहवालानुसार सहयाद्री व्याघ्र प्रकल्प ते तिलारी या दरम्यान वाघांची संख्या 4 ते 5 असण्याची शक्यता आहे. शेजारच्या गोवा राज्यात 3 वाघ असून, प.घाटात तब्बल 981 वाघ असल्याचा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढली असून ती 321 वर पोहचली आहे.
देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.2006 मध्ये या व्याघ्र गणनेला प्रारंभ झाला होता. 2018 मध्ये करण्यात आलेल्या चौथ्या व्याघ्र गणनेचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या गणनेनुसार देशात वाघांची संख्या वाढून 2967 वर पोहचली होती. 2014 च्या गणनेत ही संख्या 2226 होती. देशात सर्वाधिक वाघांची संख्या मध्यप्रदेश मध्ये (526)असून महाराष्ट्रात 321 वाघ आहेत. 2014च्या गणनेत महाराष्ट्रात 190 वाघ होते.
दरम्यान,पट्टेरी वाघाच्या अस्तित्वावरून कायम चर्चेत असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वाघ आहे,यावर या गणनेच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात यापूर्वीही वाघाचे अस्तित्व समोर आले होते. मात्र वनविभागाने वेळोवेळी ते नाकारले. अलीकडे कोल्हापूर तसेच तिलारी परिसरात कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ कैद झाल्याचे समोर आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यानजीक असणाऱ्या सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातही यावेळी वाघाचे तुरळक अस्तित्व दिसून आले आहे.यापूर्वी झालेल्या गणनेत या व्याघ्र प्रकल्पात वाघ नसल्याचे दिसून आले होते.सह्याद्री-कोकण कॉरिडॉरमधील राधानगरी,कर्नाटकातील अंशी-दांडेली,भीमगड व गोव्यातील अभयारण्ये एकमेकांशी समांतर आहेत.या तीनही राज्यातील संरक्षित क्षेत्रांना जोडणारा महत्वाचा दुवा सिंधुदुर्ग जिल्हा आहे.त्यामुळे अनेकदा पट्टेरी वाघ भ्रमण करताना या जिल्ह्यातील जंगलाचा वापर करतात.तिलारीचे अतिजैवसंपन्न जंगल तर वाघांच्या अधिवासासाठी पोषक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.दरम्यान,चौथ्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार सहयाद्री व्याघ्र प्रकल्प ते तिलारी या दरम्यान वाघांची संख्या 4 ते 5 असण्याची शक्यता आहे.गणनेच्या अहवालातील नकाशात येथे वाघांचे अस्तित्व दर्शविण्यात आले असून,मात्र ते अतिशय तुरळक प्रकारातील(लो डेन्सीटी) आहे.हे वाघ निवासी आहेत की भ्रमण करणारे हे अजून स्पष्ट झालेले नाही.तर इको सेन्सिटिव्हच्या मुद्द्यावरुन कायम चर्चेत असणाऱ्या गुजरात,महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक,तामिळनाडू, केरळ राज्यांचा भाग समाविष्ट असणाऱ्या प.घाटात तब्बल 981 असल्याचे गणनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात चार ते पाच “पट्टेरी वाघ”
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES