किरण ठुसे : पहिल्या टप्प्यात बांदा, सावंतवाडीतील लोकांना मिळणार सेवा
सावंतवाडी / अमोल टेंबकर, ता. ३० : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड या कंपनीच्यावतीने नैसर्गिक घरगुती गॅस घरोघरी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सावंतवाडीतील तब्बल अडीच हजार कुटुंबांना ऑक्टोबरपर्यंत ही कनेक्शन देऊ असा दावा कंपनीचे प्रमुख किरण ठुसे यांनी आज येथे केला.
श्री. ठुसे यांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेवून सावंतवाडीत राबविण्यात येणार्या प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी बाबू कुडतरकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. ठुसे म्हणाले, आम्ही जिल्ह्यात नैसर्गिक गॅस सेवा उपलब्ध करून देणार आहोत. येत्या पाच वर्षात तब्बल 28 हजार कनेक्शन या ठिकाणी देण्याचा आपला मानस आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या गॅसचे सबस्टेशन दोडामार्ग-आयी येथे असणार आहे. तेथून पाईपलाईनच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात दोडामार्ग ते बांदा, त्यानंतर सावंतवाडी आणि हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पाच वर्षात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यंत्रणा राबविली जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेले गॅसचे इनपुट गेल इंडिया या कंपनीकडून घेण्यात येणार आहे.
श्री. ठुसे म्हणाले, हा गॅस घरगुती असून गाड्यात, हॉटेलमध्ये, हॉस्पीटलमध्ये वापरता येणार आहे. विशेष म्हणजे तो पाईपच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याने तो वापरताना कोणताही धोका नाही. एरव्हीचा गॅस दर महिन्याला सहाशे ते सातशे असा आहे. मात्र आमचे दर दोन महिन्याला तीनशे ते सहाशे रुपये इतके कमी असणार आहे. या गॅसचे वापराबाबतचे रिडींग डिजीटल मीटरच्या माध्यमातून होणार आहे. प्रत्येक घरात पाईपच्या सहाय्याने हे कनेक्शन पोहोचणार आहे. यात कोणताही धोका नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. एरव्हीचा एलपीजी गॅस हा लीक झाल्यानंतर जमिनीवर पसरतो. मात्र आमचा पीएनजी गॅस हवेत विरून जातो. त्यामुळे हा सुरक्षीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यासाठी सहा ते सात महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास पर्यायी व्यवस्था करून घरोघरी गॅस देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रक्रियेत लोकांना चांगली सेवा मिळावी यासाठी महत्वाच्या ठिकाणचे पेट्रोलपंपसुद्धा आमच्या कंपनीकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरच आवश्यक असलेली पूर्तता केली जाईल.