गाळ्यांचा भाडेवाढीवरून विरोधी नगरसेवकात जुंपली

2

सावंतवाडी पालिका बैठक :८ हजार अनधिकृत कुटुंबाना नळ कनेक्शन

सावंतवाडी, ता. ३०: येथील इंदिरागांधी कॉम्प्लेक्समधील गाळे धारकांचे मासिक भाडे वाढविण्यावरून आज विरोधी नगरसेवक राजू बेग आणि नासिर शेख यांच्यात जुंपली. हे गाळे मालकांनी भाड्याने दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून १० टक्के भाडे वसूल करा अशी मागणी शेख यांनी केली तर त्याला बेग यांनी विरोध केला. एकतर महागाई वाढलेली आहे. त्यामुळे त्रिस्तरीय समितीने केलेली भाडेवाढ योग्य आहे असे त्यांनी सांगितले. या ठरावाला भाजपाचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी समर्थन दिले.
सावंतवाडी पालिकेची मासिक सभा आज येथील लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी झालेल्या चर्चेत इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील गाळे धारकांचे भाडे ५ टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाकडून नेमण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीने ५ टक्के भाडेवाढ करण्याचे सुचविले. याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सभागृहात माहिती दिली. या ठरावाला श्री. शेख यांनी विरोध केला. नगराध्यक्षांनी प्रत्यक्षात जावून पहावे. ज्यांनी गाळे घेतले आहेत त्यांनी ते दुसर्‍यालाच भाड्याला दिले आहेत. एक-दिड हजार भाडे पालिकेला देवून गलेलठ्ठ भाडे घेत आहेत. त्यामुळे नगरपालिकेचे नुकसान टाळण्यासाठी ५ टक्केऐवजी १० टक्के भाडे स्विकारण्यात यावे अशी मागणी केली. मात्र याला श्री. बेग यांनी विरोध केला. एकीकडे महागाई वाढत आहे. व्यापार्‍यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्रिस्तरीय सुचविलेल्या सुचनेनुसार भाडेवाढ करावी अशी मागणी केली. त्याला आनंद नेवगी यांनी अनुमोदन दिले.
या बैठकित सावंतवाडी शहरातील नव्याने बांधण्यात येणार्‍या कॉम्प्लेक्समधील २५ च्या वर सदनिका असतील तर त्यांना कचरा प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक करण्यात यावा असा ठराव घेण्यात आला. तसेच शहरात आजपर्यंत बांधण्यात आलेली जी घरे अनधिकृत आहेत अशा ८ हजार कुटुंबांना नवीन नळ कनेक्शन देण्याचा महत्वपूर्ण ठराव यावेळी घेण्यात आला.

0

4