विद्युत खांब पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान…
आचरा, ता. ३० : सोमवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने आचरा परिसराला चांगलेच झोडपले. महावितरणला याचा मोठा फटका बसला.
रात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडून तारा तूटल्याने पोल मोडून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. आचरा देवूळवाडी येथे रात्री तीनच्या सुमारास आंब्याची मोठी फांदी विद्युत तारांवर पडल्याने तारांसहीत फांदी रस्त्यावर पडून वाहतूकीसाठी अडथळा निर्माण झाला होता. ही आंब्याची फांदी दिवसा रहदारीच्या वेळी पडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. चिंदर अपराजवाडी येथेही मोठे झाड पडल्याने पाच पोल मोडून पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर झाड पडल्याने कुडोपी आचरा वाहतूक बंद पडली होती.
सोमवारी सायंकाळी सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आचरा हिर्लेवाडी येथील प्रविण दिगबर पेडणेकर यांच्या राहत्या घरानजीक असलेला माड अंगणात पडून किरकोळ नुकसान झाले. माड मोडून पडण्याच्या काही काळ अगोदर अंगणात खेळत असलेली मुले पाऊस सुरू झाल्याने घरात गेली आणि काही वेळातच अंगणात माड मोडून पडल्याने मोठी दुर्घटना टळली. हिर्लेवाडी येथील घटनेची खबर मिळताच आचरा उपसरपंच पाडुरंग वायगणकर, सदस्य रेश्मा काबळी पोलिस पाटील जगन्नाथ जोशी यानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.