मांडुकलीत पाणी भरले; गगनबावडा-कोल्हापूर मार्ग ठप्प

2

पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक ठप्प; वाहतूक फोंडामार्गे वळविली

वैभववाडी/पंकज मोरे, ता. ३० : कोकणात गेल्या तीन दिवसापासून पावसाची तूफानी बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने गगनबावडा तालुक्यातील मांडुकली किरवे दरम्यान पाणी भरल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक राधानगरी मार्गे वळविण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसापासून कोकणात धो-धो पाऊस कोसळत आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने हाहाकार माजवल्याने तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली(ता. गगनबावडा) याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जवळपास पाच फुटा पेक्षा जास्त पाणी रस्त्यावर आले आहे.
त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. मालवाहतूक करणाऱ्या गाड्या गगनबावडा येथे थांबविण्यात आल्या आहेत. तर एस. टी. बसेस राधानगरी मार्गे वळविण्यात आल्या आहेत. दरम्यान वैभववाडी पोलिसांनी तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेट्स लावले असून वैभववाडीहून कोल्हापूरकडे जाणारी एस. टी. वाहतूक फोंडामार्गे वळविण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा मार्ग पाण्याखालीच राहणार आहे.

0

4