जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी एकवटले…

8
2
Google search engine
Google search engine

जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा; घोषणांनी परिसर दणाणला…

सिंधुदुर्गनगरी,ता.१४: जुनी पेन्शन योजना लागू करा. या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील विविध ५६ केडरचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.

ओरोस रवळनाथ मंदिर येथून निघालेल्या या मोर्चातील सहभागी कर्मचाऱ्यांनी सिंधुदुर्गनगरी परिसर घोषणांनी दणाणून सोडला. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. जुनी पेन्शन आमच्या हक्काची असून ती मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यानंतर अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निवेदन देण्यात आले. कर्मचारी संघटनेचे समन्वयक राजन कोरगावकर, सरचिटणीस सत्यवान माळवे यांच्यासह सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचारी सहभागी झाले होते.