त्यांनी शुभेच्छा सुद्धा स्वीकारल्या: मग पक्षांकडून अन्याय कसा
कुडाळ,ता.२९ : राष्ट्रवादीच्या प्रदेश कमिटीवर घेण्याबाबत माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांची चर्चा झाली होती.प्रदेशाच्या बैठकीत खुद्द वरिष्ठ नेत्यांनी त्यांना कल्पना दिली होती. त्यांनी ती मान्य केली होती तसेच नव्या पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी शुभेच्छा सुद्धा स्वीकारल्या. मात्र नंतर राजीनामा देण्याची स्टंटबाजी का केली ?असा प्रश्न राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील एका नेत्याने ब्रेकिंग मालवणीशी बोलताना उपस्थित केला. जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांच्या कार्यपद्धतीबाबत स्थानिक नाराजी होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार त्यांना बदलण्यात आले. आता जिल्हाध्यक्ष लवकरच नेमण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सुरेश गवस यांनी जोरदार पाखड केली होती. आपण आपल्या पदाचा,सदस्यत्वाचा आणि पक्षाचा राजीनामा देत आहोत आणि अन्य पक्षात जाणार आहोत अशी त्यांनी भूमिका मीडियाकडे मांडली होती. या बाबत ब्रेकिंग मालवणीने वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्यासोबत जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असे गवस यांचे म्हणणे होते. जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी आपल्याला मान्य नाही प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त करून दाखवली होती. दरम्यान त्यांच्या भूमिकेनंतर जिल्ह्यातील एका बड्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्याकडून झालेला प्रकार हा केवळ स्टंटबाजी आहे असाही आरोप केला तसेच जिल्हाध्यक्षपद पदावरून बाजूला करताना त्यांना प्रदेशची जबाबदारी देण्यात आले याचा अर्थ त्यांच्यावर अन्याय झाला नाही असे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे असे त्यांनी सांगितले. जर त्यांना प्रदेश समितीवर झालेली निवड मान्य नव्हती तर तो त्यांनी शुभेच्छा कशा काय स्वीकारल्या असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.