मुख्याधिकारी जावडेकर यांच्या प्रशासनास सूचना ; नगरसेवक यतीन खोत यांनी वेधले लक्ष…
मालवण, ता. ३१ : शहरातील एलईडी पथदिव्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. देखभाल करणारा ठेकेदार पळून गेल्याने स्थानिक नगरसेवकांना सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नगरसेवकांना सध्या स्वखर्चातून पथदिव्यांच्या दुरुस्तीची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे याकडे पालिका प्रशासनाने लक्ष पुरवीत आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवक यतीन खोत यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली.
दरम्यान याची तत्काळ दखल घेत मुख्याधिकारी श्री. जावडेकर यांनी पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नवीन ठेका काढा अशा सूचना प्रशासनास दिल्या.
येथील पालिकेचे नूतन मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या जयंत जावडेकर यांचे नागरसेवकांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आरोग्य सभापती पंकज सादये, नगरसेवक यतीन खोत, ममता वराडकर, शीला गिरकर आदी उपस्थित होते.
शहरात एलईडी दिव्यांचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक वाड्यामध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका घेतलेला ठेकेदार पळून गेल्याने पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. सध्या पावसाळी हंगाम असल्याने रात्रीच्यावेळी नागरिकांना काळोखात ये-जा करताना अनेक समस्या भासत आहेत. पथदिव्यांची दुरुस्ती होत नसल्याने स्थानिक नगरसेवकांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. सध्या स्थानिक नगरसेवक स्वखर्चातूनच पथदिव्यांची दुरुस्ती करत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष पुरवून तत्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरसेवक खोत यांनी मुख्याधिकार्यांकडे केली. त्यानुसार श्री. जावडेकर यांनी तत्काळ याप्रश्नी एलईडी दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नवीन ठेका काढण्याचे आदेश प्रशासनास दिले. शहरातील काही भागात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करणार्या ईएसएलच्या ठेकेदाराला बोलावून घेत कामातील दिरंगाईबाबत समज देण्यात आली. यावेळी शहरातील विविध समस्यांवरही मुख्याधिकार्यांचे लक्ष वेधण्यात आले.