मसुरे वेरळमध्ये २५ कोटीची व्हेल माशाची उलटी जप्त, नऊ संशयित ताब्यात…

19
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

सिंधुदुर्गातील मोठी कारवाई ; जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीची कारवाई

मालवण, ता. १७ : मसुरे वेरळ माळरानावर व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी काही जण येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधिक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने नऊ संशयितांना पकडले. त्यांच्याकडून २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेल मासा उलटीसदृश पदार्थाचे तुकडे, दोन चारचाकी गाड्या व एक दुचाकी असा सुमारे २५ कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटी जप्त करण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच कारवाई आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
नऊ संशयीतांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी या घटेनची माहिती वन विभागाला दिली आहे. दरम्यान, यापुर्वी तालुक्यातील तळाशील समुद्र किनाऱ्यावरून एकूण २७ लहान-मोठ्या आकाराचे सुमारे १८ किलो ६०० ग्रॅम वजनाचे व्हेल मासा उलटी सदृश पदार्थाचे तुकडे जप्त करण्यात आले होते. ही कारवाई १० फेब्रुवारी रोजी पोलीसांनी केली होती. आणि आता पुन्हा तालुक्यातच मोठ्या प्रमाणात उलटी सदृश पदार्थाचे तुकडे जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरूनाथ कोयंडे, अनिल धुरी, प्रविण वालावलकर, कृष्णा केसरकर, प्रथमेश गावडे, यश आरमारकर, चंद्रहास नार्वेकर, रवि इंगळे, चंद्रकांत पालकर यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. तालुक्यातील मसदे ते मसुरे मार्गावर व्हेल माशाच्या उलटी सदृश पदार्थ विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. याठिकाणी सापळा रचल्यानंतर दोन चारचाकी गाडी आणि एक मोटारसायल त्याठिकाणी आली, आणि त्याची तपासणी केली असता चारचाकी (एमएच ४८ एडब्यु ५४२३) यातून १२ किलो ५२८ ग्रॅम वजनाचा उलटी सदृश पदार्थ तर चारचाकी (एम ०७ एजी ३६१० ) यातून ११ किलो ७३६ ग्रॅम वजनाचा उलटी सदृश पदार्थ जप्त करण्यात आला. याबरोबरच एक मोटारसायकल क्रमांक (एमएच ०७ झेड ६४८८) ही जप्त करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक विजय यादव आणि त्यांच्या टिमनेही महत्वपूर्ण सहकार्य केले. दुपारी दोन वाजता सुरू करण्यात आलेली कारवाई सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होती.
यापुर्वीही मालवणमध्ये उलटी सदृश पदार्थ सापडून आला होता. सांगली येथून काही संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर सिंधुदुर्गचे कनेक्शन समोर आले होते. आता तर जिल्ह्यातील मोठी कारवाई पुन्हा मालवणमध्ये करण्यात आली आहे. स्थानिकांचा समावेश यात असल्याचे दिसून आले. यामुळे या स्थानिकांच्या सोबत इतर काही सहकारी आहेत काय? उलटी पदार्थ विक्रीचे इतर कनेक्शन आहे काय? या तपास करण्यासाठी संशयीतांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. सर्व नऊही संशयीतांवर वन्य जीव संरक्षक अधिनियम १९७२ कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आज सापडलेल्या अंबरग्रीस सदृश पदार्थ ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला आहे. अंबरग्रीस तस्करांचे मोठे रॅकेट सिंधुदुर्गात कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. तांत्रिकदृष्ट्या हे प्रकरण पोलीसांनी हाताळले तर अनेक नविन गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे.
स्पर्म व्हेल प्रजातीतील देवमाशाची उलटी अर्थात अंबरग्रीस अतिशय सुगंधी असते. तिला जगभरात मोठी मागणी आहे. सोन्याच्या भावाने ती विकली जाते. त्यामुळे ‘समुद्रातील तरंगते सोने’ असेही तिला म्हटले जाते. देवगड तालुक्यातील तारामुंबरी, तर मालवणातील देवबाग समुद्र किनारी सापडलेली देवमाशाची उलटी स्थानिक मच्छीमारांनी वन विभागाच्या ताब्यात दिली होती. त्यानंतर जिल्ह्यात अंबरग्रीस तस्करीची प्रकरणेही उघडकीस आली होती. दरम्यान, सांगलीत उघडकीस आलेल्या अंबरग्रीस तस्करी प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याचे ‘तळाशील कनेक्शन’ समोर आले होते. त्यानंतर आता तर सर्वात मोठी कारवाई करण्यात येवून तब्बल २५ कोटी रूपयांचा पदार्थ जप्त करण्यात आल्याने पोलीस यंत्रणेबरोबरच वन विभागाकडून सखोल चौकशी होणार आहे.

\