आचारसंहिता लागू ; ३१ ऑगस्टला सार्वत्रिक निवडणूक…
मालवण, ता. ३१ : तालुक्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये मर्डे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव तर बिळवस व देऊळवाडा ग्रामपंचायत सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाले आहे. या तिन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. ३१ ऑगस्टला या तिन्ही ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होतील अशी माहिती नायब तहसीलदार सुहास खडपकर यांनी दिली.
मसुरे ग्रामपंचायतीचे काही महिन्यांपूर्वी विभाजन होऊन मर्डे, देऊळवाडा, बिळवस या तीन नव्या ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. सध्या या तिन्ही ग्रामपंचायतीवर प्रशासक कार्यरत आहेत. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज येथील तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली. यात मर्डे ग्रामपंचायत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी तर देऊळवाडा, बिळवस या दोन ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
तिन्ही ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक ३१ ऑगस्टला होणार असल्याने आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. या तिन्ही ग्रामपंचायतीसाठी ९ ते १६ ऑगस्ट या कालावधीत शासकीय सुट्टी वगळून नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी १९ ऑगस्टला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट असून याचदिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. ३१ ऑगस्टला सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच यावेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडेल अशी माहिती नायब तहसीलदार श्री. खडपकर यांनी दिली.