कणकवली, ता.१८ : शहरात आजही स्टॉल हटाव मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. यावेळी एका स्टॉलधारकाने कॅनमधून अाणलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर रॉकेलचे कॅन काढून घेतले. तसेच यापुढे असा प्रकार झाल्यास कारवाई इशारा दिला. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
कणकवली शहरात आज उड्डाणपुलाखालील स्टॉल हटविण्याची मोहीम सुरू ठेवण्यात आली. यात शहरातील बसस्थानकासमोरील काही स्टॉल काढण्यात आले. यात कलमठ येथील एका व्यावसायिकाचा स्टॉल उचलल्यानंतर त्या व्यावसायिकाने आपल्या सोबत आणलेल्या कॅनमधील रॉकेल अंगावर ओतून घेतले. ही बाब तेथील बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच, त्यांनी तत्काळ कारवाई करून त्या व्यक्तीकडून रॉकेलचे कॅन काढून घेतले. तसेच यापुढे असा प्रकार घडला तर गुन्हा दाखल करण्याचाही इशारा दिला. यावेळी त्या व्यावसायिकाने जर उड्डाणपुलाखालील स्टॉल काढले जात असतील तर फुटपाथलगत महामार्ग हद्दीमध्ये येणारे स्टॉल देखील हटवावेत अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी त्याबाबत महामार्ग विभागाकडे तक्रार करण्याचे निर्देश दिले. दरम्यान त्या व्यावसायिकाने नंतर घर गाठले. या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली नव्हती.